आमदार किशोर जोरगेवार आणि चंद्रपूर पोलिसांनी पकडली 72 लाखांची अवैध दारू; सात जणांना अटक 

चंद्रपूर शहराच्या वेशीवर दारूचा मोठा साठा स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला. पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई काल मंगळवारला रात्री 11 वाजताच्या सुमाराला झाली. सहा वाहनातून तब्बल एक हजार 529 देशी दारूच्या पेट्या जप्त केल्या. 77 लाख 34 हजार रुपये जप्त दारूची किंमत आहे.

चंद्रपूर :- दारूबंदी उठविण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरु असतानाच चंद्रपूर शहराच्या वेशीवर दारूचा मोठा साठा स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी पकडला. पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई काल मंगळवारला रात्री 11 वाजताच्या सुमाराला झाली. सहा वाहनातून तब्बल एक हजार 529 देशी दारूच्या पेट्या जप्त केल्या. 77 लाख 34 हजार रुपये जप्त दारूची किंमत आहे. या प्रकरणात सात जणांना पोलिसांनी अटक झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच वर्षात दारू तस्करी आणि पोलिस कारवाई नित्याचीच झाली आहे. मात्र पहिल्यांदाच एखाद्या लोकप्रतिनिधीने रस्त्यावर उतरून दारू साठा जप्त केल्याची ही पहिलीच घटना आहे. नागपूरवरून मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपूर जिल्ह्यात येत असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांना मिळाली. दारू घेऊन येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची योजना आखली. यासाठी 15 वाहनांचा ताफा तयार केला. मागील तीन दिवसांपासून हा ताफा दारू तस्करांच्या मागावर होता.

दरम्यान काल मंगळवारला रात्री नागपूर मार्गे चंद्रपुरात मोठा दारू साठा येत असल्याची माहिती जोरगेवारांना मिळाली. दारू घेऊन येणाऱ्या मार्गावर आपली माणसं तैनात केली. ते स्वतः ही यात सामील झाले. संशयित वाहने चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच खाबांडा जवळ जोरगेवार यांनी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनं थांबली नाही. जोरगेवार यांनी वाहनांचा पाठलाग सुरू केला. दारू तस्करांनी जोरगेवार यांच्या वाहनावर काचेच्या बाटला फेकल्या. त्याही परिस्थितीत पाठलाग सुरूच होता. याच दरम्यान जोरगेवार यांच्या ताफ्यातील काही वाहनं समोरून आली. ताडाळी ते पडोली दरम्यान या वाहनांची अडवणूक केली.

यावेळी दारूची चार वाहनं पकडली. काही अंतरावर जोरगेवार यांच्या ताफ्यातील दोन वाहनांनी अन्य दोन दारूची वाहन अडविली. यावेळी दारूच्या वाहनाच्या सुरक्षेत असलेले पायलट वाहनही पकडण्यात आले. जोरगेवार यांनी पडोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कासर यांना माहिती दिली. कासर यांनी वाहन ताब्यात घेतली. पोलिसांनी एकूण एक कोटी 17 लाख 33 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सध्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दारू तस्करांनी वाहन पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सुटकेसाठी नवी शक्कल लढविल्याचे या निमित्ताने समोर आले. या वाहनांकडे दारू वाहतुकीचा परवाना असतो. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यात दारू पोचविण्यासाठी हा परवाना असतो. मात्र प्रत्यक्षात ही वाहन दारूबंदीच्या जिल्ह्यात पाठविली जातात. पोलिसांच्या हाती दारू घेऊन येणारी वाहन लागली तर रस्ता चुकला असे सांगून सुटका केली जाते. याप्रकरणातील वाहनांकडे दारू वाहतुकीचा परवाना होता. बुटीबोरी-वरोरा-वणी या मार्गाने ही वाहन जाणे अपेक्षित होते. परंतु ते चंद्रपूरच्या दिशेने आले आणि आमदारांच्या हाती लागले. अटकेतील वाहनचालकांनी आम्ही वाट चुकलो, असाच बयाण दिला आहे. त्यामुळे मुद्देमालासह त्याची सुटका सहज होईल, असे कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here