यवतमाळ बर्ड फ्लू’च्या संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात, चार हजार कोंबड्यांचा मृत्यू.
यवतमाळ :- कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या जिल्ह्यात आता ‘बर्ड फ्लू’च्या संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आर्णी तालुक्यातील मोराचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत यवतमाळ शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमध्ये चार हजार बर्डचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी सुरक्षितता म्हणून दहा किलोमीटरचा परिसर ऍलर्ट झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत मरण पावलेल्या पक्ष्यांचा एच 1, एन 1 या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील पशुसंवर्धन यंत्रणाही सज्ज झाली आहे. कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणावर नियंत्रणात आली असतानाच आता ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण झालेला आहे. मागील काही दिवसांपासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यातही वाढता आहे. पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी सायखेडा येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता. आर्णी तालुक्यात आठ मोर दगावले आहेत. आर्णी येथील मोरांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणी ऍलर्ट झोन घोषित करून उपाययोजना राबविले जात आहेत. कोंबडी, मोर यानंतर कावळा अशा पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याने त्यांचे नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आलेले आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत मोरांचे नमुने आले आहेत. अजूनही अनेक नमुने प्रलंबित आहेत. गेल्या दोन दिवसांत शहरालगत असलेल्या सावरगड-रातचांदणा मार्गावरील पोल्ट्रीमधील पक्षाचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी जवळपास एक हजार 700 बर्ड, तर मंगळवारी दोन हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत तीन हजार 700 हजार पक्षी मृत्यूमुखी पडले.