सतत शिकत राहणे आणि व्यक्तिमत्व विकास करणे हीच यशाची गुरुकिल्ली – मिरां बोरवणकर

35

सतत शिकत राहणे आणि व्यक्तिमत्व विकास करणे हीच यशाची गुरुकिल्ली – मिरां बोरवणकर

सतत शिकत राहणे आणि व्यक्तिमत्व विकास करणे हीच यशाची गुरुकिल्ली - मिरां बोरवणकर
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: आयुष्यात सतत शिकत राहणे आणि व्यक्तिमत्व विकास करत राहणे हा यशाचा गुरुमंत्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक मिरां बोरवणकर यांनी अलिबाग परिसरातील युवकांना दिला.

इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीक हेल्थ (IPH) आणि आवाहन, ठाणे यांच्या सहयोगाने विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग आयोजित वेध -२०२५ कार्यक्रमांतर्गत त्या उपस्थितांशी संवाद साधत होत्या.
येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी वेध अलिबागचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग परिसरातील सुमारे सातशे विद्यार्थी व सुजाण नागरिकांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमात भूतपूर्व आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, “चला हवा येऊ द्या” चे पत्रलेखक अरविंद जगताप, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ यांसह डिझाईन जत्रा या आगळया सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या वास्तुविशारद विनिता कौर एम. चिरागिया, प्रतीक धानमेर, शार्दुल पाटील यांच्या दिलखुलास आणि अभ्यासपूर्ण मुलाखती विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यावसायिक छायाचित्रकार आणि वर्क अवे पद्धतीने जगभ्रमण करणाऱ्या आभा चौबळ यांनी त्यांच्या एकल प्रवासातील रोमांचक अनुभवांचे कथन केले. स्वतःचा शोध घेण्यासाठी एकल प्रवास हे प्रभावी माध्यम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर यांनी येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील आव्हाने आणि संधी यांचा सविस्तर उहापोह केला. मानवी विवेक हा मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील महत्त्वाचा फरक असून येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विवेकपूर्ण वापर मानवी जीवन अधिक सुखकर करेल असे मत त्यांनी मांडले. तसेच आधुनिक युगात मातीशी इमान राखून असलेल्या जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीला दाद देत उपस्थितांनी ऊभे राहून मानवंदना दिली. वेध अलिबाग २०२५ च्या आकर्षण असलेल्या माजी पोलीस महासंचालक मिरां बोरवणकर यांनी त्यांच्या दिलखुलास मुलाखतीतून उपस्थितांची मने जिंकली. शाळेपासून सेवानिवृत्ती पर्यंतचा आव्हानांनी भरलेला त्यांचा जीवनप्रवास मोकळेपणाने मांडत त्यांनी सभागृहात बहुसंख्येने उपस्थित युवा वर्गाला मार्गदर्शन केले. आयुष्यात येणाऱ्या संकटांनी खचून न जाता आव्हाने मानून त्यांना सामोरे गेलात तर यश निश्चित असते असे प्रतिपादन त्यांनी केले. आपली आवड आणि कल पाहून करिअरची निवड करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

दुपारच्या सत्राची सुरुवात डिझाइन जत्रा या सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या विनिता कौर एम. चिरागिया, प्रतीक धानमेर, शार्दुल पाटील यांच्या मुलाखतीने झाली. पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक तंत्र अंगिकारून घरबांधणी करणाऱ्या या युवा वास्तुविशारदांनी त्यांना याकामी मिळालेल्या प्रेरणा आणि आलेली आव्हाने याविषयी मोकळेपणाने गप्पा मारल्या. संवेदनशील साहित्यिक अरविंद जगताप यांच्या मुलाखतीने वेध संमेलनाची सांगता झाली. बीड येथील अभावग्रस्त बालपणापासून ते मुंबई पुण्यातील सिनेमा मालिकांचे प्रतिथयश लेखक इथपर्यंतच्या प्रवासाचे जगताप यांनी कथन करताना कधी उपस्थितांना खळाळून हसवले तर कधी अंतर्मुख करत भावविभोर केले. या दरम्यान त्यांनी त्यांच्या पुस्तकातील बापमाणूस या लालित्यपूर्ण लेखाचे वाचन केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे या मान्यवरांसह विद्यासन अलिबागचे संचालक डॉ राजीव धामणकर, डॉ रिटा धामणकर, विद्या पाटील आणि अलिबाग परिसरातील बहुसंख्य शालेय विद्यार्थी, सुजाण नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.