इयत्ता बारावीच्या (उच्च माध्यमिक) परिक्षेला आजपासून सुरुवात; जिल्ह्यातील 31 हजार 272 विद्यार्थी बारावीच्या परिक्षेला जाणार सामोरे

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

अलिबाग:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या (उच्च माध्यमिक) परिक्षेला मंगळवार (ता.21) पासून सुरुवात होणार आहे.  

        या परीक्षेला रायगड जिल्ह्यातील 31 हजार 272 विद्यार्थी सामोरे जाणार असून जिल्हाभरात 46 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परिक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. तसेच कॉपी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. बारावी परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये तहसिलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. या भरारी पथकांवर उपविभागीय अधिकारी यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

ज्या धर्तीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते त्या धर्तीवर जिल्ह्यात शाळांत प्रक्रिया राबविण्यात येणार असून, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षा देणारे विद्यार्थी, पर्यावेक्षक, परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी, भरारी पथके यांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या परिसरात झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here