डोंबिवलीत बारबालेची हत्या, हॉटेलमधील वेटरने गळा दाबून केली हत्या.

56

डोंबिवलीत बारबालेची हत्या, हॉटेलमधील वेटरने गळा दाबून केली हत्या.

 Barbale murdered in Dombivali, strangled by hotel waiter.

✒दयानंद सावंत प्रतिनिधी✒
मुंबई,दि.20 मार्च:- मुंबईतील डोंबिवली पश्चिम कोपर रोड परीसरातील वसाहातीत एक बारबालेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या 46 वर्षीय बारबालेला मारहाण करत गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तपास करत कल्याण क्राईम ब्रँच व विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. श्रीनिवास बसवा मडीवाल असे आरोपीचे नाव असून तो मयत महिला काम करत असलेल्या बारमध्येच वेटर म्हणून काम करत होता.

मयत आरती सकपाळ ही डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात राहत होती. कल्याणमधील एका बारमध्ये वेटरचे काम करत ती आपला उदरनिर्वाह करत होती. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने ती काही महिन्यांपासून मच्छी विक्रीचा व्यवसाय करत होती. मयत आरतीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी संध्याकाळी तीला फोन केला होता. मात्र तिने फोन न उचलल्याने त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना आरती मृतावतस्थेत आढळली.

या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांसह कल्याण क्राईम ब्रँचचे पथक तपास करत होते. ती ज्या बारमध्ये काम करत होती त्या बारमध्ये पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा घडल्याच्या रात्री बारमधील गेस्ट हाऊसमध्ये राहणारा वेटर श्रीनिवास बाहेर असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा श्रीनिवासवर संशय बळावला.

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी श्रीनिवास याला कल्याण स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघांचा वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात आरतीचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.