राज्यात गृहमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण, जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता.

47

राज्यात गृहमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण, जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता.

Jayant Patil's character is likely to be discussed in the state.

मुंबई:- सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल केल्यानंतर आता हे प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही भोवण्याची शक्यता आहे. राज्यात आता गृहमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीने देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

उद्योगपती अंबानीच्या घराजवळ आढळलेली स्फोटके, मनसुख हिरेनचा मृत्यू आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना एनआयएने केलेली अटक या सर्व प्रकरणावरून भाजपने ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकाने पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या केल्या. मात्र यात केवळ पोलीस अधिका-यांचा बळी दिला जातोय, असा आरोप होत आहे. त्यामुळे आता गृहमंत्री देशमुखांचाही राजीनामा घ्यावा, असा सूर महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत यावर खल सुरु असल्याचे समजते. तसेच काल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेण्याचे हेच कारण असल्याचे समजते. देशमुखांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव समोर आले आहे. पाटील हे राष्ट्रवादीतील अत्यंत अनुभवी नेते आहेत. मंत्रिमंडळात त्यांनी यापूर्वी अर्थ, संसदीय कामकाज, ग्रामविकास, जलसंपदा अशी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांचे नाव गृहमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे.