प्रामाणिकपणाचा आदर्श उभा करणारे सफाई कर्मचारी प्रकाश शेळके
सापडलेले पाकीट परत करून दिला प्रामाणिकपणाचा संदेश
✍️ निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133 📞
माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे आदिवासीवाडी येथील रहिवाशी सौ. सीता बाळू जाधव यांचे रोख रक्कम चार हजार पाचशे रुपये असलेले पाकीट हरवले होते. अनेक ठिकाणी शोध घेऊनही ते सापडले नाही.
दरम्यान, वरचीवाडी ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी प्रकाश हरिश्चंद्र शेळके यांना हे पाकीट सापडले. त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयात पाकीट जमा केले. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सौ. सीता बाळू जाधव यांनी संपर्क साधला आणि पाकीट परत मिळाले.
प्रकाश शेळके यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे सौ. सीता बाळू जाधव यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी भारती पाटील मॅडम यांनी त्यांचा विशेष सत्कार केला आणि बक्षीस देऊन सन्मान केला.
या प्रामाणिक कृत्यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून, प्रकाश शेळके यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.