वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसम ठार
🖋अश्विन गोडबोले
📱 ८८३०८५७३५१
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
प्राप्त माहितीनुसार, दशरथ पेंदोर (65) हे सिन्हाला येथे राहतात. त्यांच्याकडे शेळ्या असून, ते काल (20 मे) रोजी शेळ्या चराईसाठी गावतलावाकडे गेले परंतू सायंकाळी घरी परत आले नाही. गावकऱ्यांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शोधाशोध केली असता याच परिसरात छिन्न विछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे, या परिसरात मागील काही दिवसांपासून ताडोबातील वाघडोह या प्रसिद्ध वाघाचा वावर आहे. म्हातारा आणि अशक्त झालेला हा वाघ माणसं आणि जवळपासच्या गावातील पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो याची कल्पना असतानासुद्धा व वनविभागाची वाघावर नजर असूनसुद्धा या वाघाने दशरथ यांचा बळी घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल तीव्र नाराजी आहे. दशरथ यांचा शेळ्यांचा व्यवसाय असून ते नेहमीप्रमाणे गावाशेजारील असलेल्या तलावालगत बकऱ्या चराईसाठी गेले होते. दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. मागील काही दिवसांपासुन या भागात सदर वाघाचे हल्ले सुरु आहेत. या वाघाचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून, वनविभाग कुठे कमी पडत आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.