मुलुंड – न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.) ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील तळागाळातील, विशेषतः आदिवासी पाड्यांतील व ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी देण्यासाठी कार्यरत आहे. शिक्षणाचा प्रसार करणे तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगारक्षम प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या सामाजिक भानातून प्रेरित होऊन, दिनांक १७ मे २०२५ रोजी मुलुंड येथील संभाजीनगर परिसरात ‘अतिरिक्त मोबाईल वापराचे मुलांवर होणारे दुष्परिणाम आणि पालकांनी घ्यावयाच्या उपाययोजना’ या विषयावर पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आजच्या युगात मुले लहान वयातच मोबाईलच्या आहारी जात असून, याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी पालकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. शिबिरात संस्थेच्या अध्यापिका मा. स्वप्नाली पवार व संचालिका मा. अनिता खरात मॅडम यांनी पालकांशी थेट संवाद साधत मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम स्पष्टपणे मांडले.
त्याचबरोबर मोबाईलच्या पर्यायाने मुलांना चित्रकला, खेळ, वाचन, संवाद, समूह उपक्रम अशा सृजनात्मक गोष्टींमध्ये गुंतवून त्यांचा वेळ कसा सकारात्मक व उपयोगी वळवता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मुलांकडून चित्रं काढून घेण्यात आली व ‘आपला वेळ सर्जनशील उपक्रमांमध्ये घालवावा’ हे पटवून देण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. गणेश खरात, सचिव मा. महेश गडांकुश, पदाधिकारी मा. सुनील कांबळे, मा. चंद्रकांत सोनवणे, मा.विजय काळे, मा.संजीवनी रोकडे, मा.शीतल घाणेकर यांच्यासह अनेक मुले आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू प्रगती शैक्षणिक संस्था भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवत राहणार आहे. या कार्यात समाजातील जागरूक व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक स्वरूपात संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचवता येईल आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येईल.