योग हि निरोगी जीवन जगण्याची कला व विज्ञान – आ. किशोर जोरगेवार

43

योग हि निरोगी जीवन जगण्याची कला व विज्ञान – आ. किशोर जोरगेवार. परिवर्तन योगा परिवाराच्या वतीने जागतिक योगा दिनाचे आयोजन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो: 8830857351

चंद्रपूर,21 जून: आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी जीवनात व्यायाम हा महत्त्वाचा भाग बनला आहे. योग ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आध्यात्मिक शिस्त असून योग क्रिया मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणत लक्ष केंद्रित करते. योग हि निरोगी जीवन जगण्याची कला आणि विज्ञान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. 

 परिवर्तन योगा परिवार आणि आरोग्यम् फाउंडेशनच्या वतीने पोलिस फुटबॉल मैदानात जागतिक योगा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. पूढे बोलताना ते म्हणाले की, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता किमान एक तास योगा करण्याची गरज आहे. चंद्रपूरात प्रदूषण अधिक आहे. उन्हाचा पारा येथे अधिक असतो अशात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योग हे उत्तम माध्यम ठरु शकतो. योग ही भारतीय संस्कृतीत आदी काळापासून चालत आलेली प्राचीन क्रिया आहे. विविध आसने करून शरीर लवचिक आणि स्थिर बनवणे असा योगासना मागचा उद्देश असतो. शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने योग फायदेशीर आहे.   

आज शरीर निरोगी राखणे हे अत्यावश्यक बनले आहे. निरोगी शरीर आणि मन हाच खरा यशाचा मंत्र आहे. शरीरात ऊर्जेचा प्रवाह हा खेळता असला पाहिजे. त्यासाठी शरीरशुद्धी खूपच आवश्यक मानली जाते. आज दगदग आणि स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. विविध व्यसने, मनोरंजनाची साधने माणूस दिवसेंदिवस निर्माण करत आहे. परंतु धैर्य मात्र त्याला प्राप्त झालेले नाही. ते धैर्य प्राप्त करण्यासाठी आता योगा कडे वळण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले. योगा ला प्रोत्साहण देण्यासाठी आपली तयारी असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. आता योगा बद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. शहरातील प्रत्येक भागात योगा प्रात्याक्षिके केल्या जात आहे. ही आनंदाची बाब असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला योगा प्रशिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अनिल फाले, नितेश मल्लेवार, किसनराव झाडे, विशाल गाजीनवार, पुरुषोत्तम कडवे, कुंदन खोब्रागडे, रुपाली मल्लेवार, प्रमोद नागरकर, नानू बदखल, पूष्पा झाडे, नाना चटकी, एकनाथ रासेकर, महादेव गौरकार, नंदु लडके, महेंद्र राहागडाले आदींची उपस्थिती होती.