वर्ष भरत केली राखरांगोळी
त्रिशा राऊत नागपुर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
नागपूर :- नागपूर. येथे एका २१ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विवाहितेने आत्महत्या केल्याची नोंद आहे, परंतु तिच्या वडिलांनी पती आणि सासूवर हत्येचा आरोप केला आहे. हुंडाबळी आणि शारीरिक-मानसिक छळामुळे चैतालीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळघाट येथे २१ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं चैताली मनोज कामडी हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चैतालीने १७ जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांकडे झाली असली, तरी ही आत्महत्या नसून थेट हत्या आहे, असा गंभीर आरोप तिचे वडील रामदास मेघरे यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत विवाहितेचे वडील रामदास मेघरे यांनी थेट तिच्या पती मनोज कामडी आणि सासूवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चैतालीचा विवाह अवघ्या १४ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र लग्नानंतर सतत सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला होता. विशेषतः मुल होत नसल्याच्या कारणावरून तिला सातत्याने त्रास दिला जात होता, असा दावा वडिलांनी केला आहे.या प्रकरणात चैतालीवर होणाऱ्या अत्याचारांमुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती आणि अखेर तिने गळफास घेऊन जीवन संपवलं, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, वडिलांनी पोलिसांपुढे उपस्थित केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाकडे अधिक गंभीरतेने पाहिलं जात आहे. बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणं), ४९८अ (सासरच्यांकडून छळ) तसंच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी मृत विवाहितेचा पती मनोज कामडी याला अटक केली आहे. तर सासू सध्या आजारी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती बुट्टीबोरी पोलिसांनी दिली. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच सासूविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.चैतालीच्या मृत्यूमुळे मेघरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीला न्याय मिळण्यासाठी ते शेवटपर्यंत लढणार आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी नागरिकांकडूनही होत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा समाजाला हादरवून सोडले आहे