वणा नदीच्या तीरावरील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 51 फूट विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांचा मळा फुलला.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- भेटी लागी जिवा । लागलीसे आस । पाही रात्रीं दिवस । वाट तुझी ॥ आर्त साद देत शेकडो माळकरी आज पहाटे पासूनच वणा नदीच्या तीरावरील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 51 फूट उंचीच्या विठ्ठलाच्या चरणी नम्र होत होते. आज ब्रह्ममुहूर्तावर कान्हापुरचे शेतकरी छाया व संजय भेंडे यांनी सपत्नीक विठूरायाचे पूजन केले. यावेळी मंदिर विश्वस्त रामा फाले व भक्त मंडळी उपस्थित होती.
चंद्रभागेचं प्रतिरूप असलेल्या वणाच्या तीरावर कर कटेवर ठेऊन उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शेकडो विठ्ठल भक्तांनी आज या माय माऊलीचे दर्शन घेऊन या महामारीपासून देशाला मुक्त करण्याचे साकडे घातले.
यावेळी विविध दिंडी पथकांनी रिंगण सोहळ्यात भाग घेतला.
दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने अवघा सोहळा बंद होता. यंदाही बंधने आहेतच. परंतु, त्या नियमांचे काटेकोर पालन करीत भक्तांनी मर्यादेत राहून विठू चरणी आपली सेवा देते झाले. यंदा वणा नदी दुथडी भरून वाहत असताना भक्तांच्या भक्तीचाही पूर ओसडून वहात होता. धनंजय बकाणे, प्रमोद गोहणे, सुरेश वाटकर, गोपाल भोयर, हरिभाऊ भोयर, दिगंबर दुधे, लक्ष्मण भेंडे, प्रसाद पाचखेडे, देवा जोशी व असंख्य कार्यकर्त्यांनी दर्शनार्थीची चोख व्यवस्था केली.