कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम
नियमित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण
अँड. रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:समाजयोजनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील एनआरएचएम तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर हे आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित येणारे आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाले आहे. नियमीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे.
रायगड जिल्ह्यात 610 हून अधिक कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करून घेण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र शासन दरबारी आवाज उठवूनही त्या निर्णयाची अंमलबजावणी आणि अन्य मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.19) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला रायगड जिल्हापरिषद कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कर्मचारी संपावर गेल्याने नियमीत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे नियमीत आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, नियमितीकरणाबरोबरच मानधन वाढ, लॉयल्टी बोनस, भविष्यनिर्वाह निधी, विमा सुविधा, तसेच बदली धोरण यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात आरोग्यमंत्री यांनी 8 व 10 जुलै 2025 रोजी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिले होते. तथापि, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनादरम्यान सर्व आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. ब्लड बँक, लसीकरण सत्रे तसेच विविध ऑनलाईन व ऑफलाईन अहवाल तयार करण्याची कामे पूर्णपणे बंद राहिली आहे. आरोग्य अभियानातील कर्मचारी अनेक वर्षे अल्प मानधनावर कार्यरत असून, ग्रामीण व शहरी भागात आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. त्यामुळे आता सरकारकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. परंतु, रुग्ण व इतर शासनाच्या योजना नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियमीत कर्मचाऱ्यांकडून ही कामे करून घेतली जात आहेत.
डॉ. मनिषा विखे
जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड
एनआरएच अंतर्गत काम करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच शासकिय व प्रशासकिय कामे वेळेत पुर्ण व्हावीत, यासाठी नियमीत कर्मचाऱ्यांकडून ही कामे करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक