अलिबाग मध्ये शिवसेना – शेकापची एकमेकांविरोधात निषेध आंदोलने
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मंगळवारी शिवसेना नेत्या, आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या महाराष्ट्र प्रवक्त्या, माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांच्यातील हातघाई प्रकरण अद्याप शांत व्हायचे नाव घेत नाही. आज देखील यावरून राजकारण सुरू असल्याचे पहायला मिळाले. शेकाप – शिवसेनेने एकमेकांच्या विरोधात आंदोलने करून निषेध नोंदवला.
सकाळी शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकरी भवन समोर शेकापने निदर्शने करण्यात आली. यावेळी मानसी दळवी आणि भाग्यता पाटील यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, अलिबाग तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, शेकाप शहर महिला आघाडी प्रमुख ॲड. निलम हजारे आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रलेखा पाटील यांच्यावरील हल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या स्वाभीमानावर झालेला हल्ला आहे. समोरून हल्ला करण्याची त्यांची हिम्मत नाही, म्हणून मागून हल्ला करण्याचा डाव केला. संपूर्ण राज्यात शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी आक्रमक म्हणून ओळखली जाते, त्या पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे. चवळ्या पावळ्यांना महत्व न देता सुरु असलेल्या दंडेलशाही विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन ॲड. मानसी म्हात्रे यांनी यावेळी शेकाप कार्यकर्त्यांना केले.
या निषेध आंदोलनाला शिवसेनेनेही तितक्याच ताकदीने प्रत्त्युत्तर दिले. जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीनंतर दुपारी शिवसेनेने निषेध आंदोलन केले. यावेळी मानसी दळवी, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख संजीवनी नाईक, जिल्हा प्रमुख राजा केणी,दिलीप भोईर, अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी,कामगार नेते दीपक रानवडे,सचिन राऊळ,संदेश थळे, महिला आघाडीच्या भाग्यता पाटील, प्रवक्ता जितेश्री पाटील, आदिंसह शिवसेना पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले.
हा वाद निर्माण व्हायला नको होता. सर्व सामोपचाराने सुरू होते. परंतु दुःखद प्रसंगी 50 खोके हा विषय काढून राजकारण करण्याची गरज नव्हती. शोकाकुल परीवाराला आधार देण्याऐवजी तेथे राजकारण सुरू झाले त्यामुळे साहजिकच ही प्रतिक्रिया उमटल्याचे महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक यांनी यावेळी सांगितले.
काल जे घडलं ते फार खालच्या पातळीवरचे राजकारण होते. कुणाचे नाव न घेता 50 खोके म्हटलं तर कुणाला झोंबण्याचे कारण नव्हते. राजकारणात विरोध असला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, टीका देखील सहन केली पाहिजे. पण हे घाणेरडं राजकारण मी अनुभवलं आहे. अशा पदाधिकारयांमुळे आमच्या अलिबागची, रायगडची प्रतिमा मलीन होते ही बाब मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर धालणार आहे.
– चित्रलेखा पाटील, शेकाप प्रवक्त्या
प्रसंग कुठलाही असो चित्रलेखा पाटील नेहमीच 50 खाके म्हणतात .आम्हाला हिणवत असतात. परंतु असे आरोप होवून देखील इथल्या जनतेने महेंद्र दळवी यांच्या सारखा योग्य लोकप्रतिनिधी निवडला. ही संधी इथल्या जनेतेने दिली. शेवटी आम्हालाही मन आहे, भावना आहेत, आत्मसन्मान आहे. त्यामुळे मी माझ्या भाषेत उत्तर दिलं.
– मानसी दळवी, शिवसेना नेत्या.
………
बातमीत दोन्ही आंदोलनांचे फोटो घ्यावे