सारणी येथे आदिवासी महिलांचे रानभाज्यांचे स्टॉल्स – शासनाकडे सोयीसुविधांची मागणी
अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
डहाणू :- डहाणू तालुक्यातील सारणी परिसरात दररोज 40-50 आदिवासी महिला रानभाज्यांचे स्टॉल लावत आहेत. पावसाळ्यात डोंगर व जंगल भागातून आणलेल्या या भाज्यांना शहरातील लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या स्टॉल्सवर वास्ता, शिंद, करडू, कर्टूल, माठ, पाल्यभाज्या तसेच फुलांच्या पाकळ्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. यासोबत खारवलेली फळं, औषधी वनस्पती आणि पारंपरिक पदार्थांचीही रेलचेल पाहायला मिळते. आरोग्यदायी व नैसर्गिक अन्नासाठी शहरी ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.
या उपक्रमामुळे आदिवासी महिलांना रोजगाराची नवी संधी मिळत असून, त्याचबरोबर आपली पारंपरिक खाद्यसंस्कृतीही जपली जात आहे.
मात्र, महिलांना अजूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. छत्र्या, वजन काटे, स्टॉल्स, बास्केट, केरेट आणि बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध नसल्याने त्यांची मागणी शासनाकडे सातत्याने केली जात आहे.
डहाणू तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी सांगितले की, “मागे काही साहित्य देण्यात आले आहे. पुढे निधी उपलब्ध झाला तर प्राधान्याने सारणीतील महिलांना साहित्य देऊ.”
तर सारणी ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश ठाकरे यांनी आश्वासन दिले की, “महिलांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आवश्यक साहित्य मिळवून देण्यासाठी शासन व संस्थेकडे पाठपुरावा करू.”
स्वतः रानभाज्या विकणाऱ्या आदिवासी महिला लता वेडगा यांचे म्हणणे आहे की, “आम्ही भाज्या आणण्यासाठी कुटुंबातील सदस्यही मदत करतात. मात्र आम्हाला छत्र्या, काटे, बास्केट आणि खुर्च्या मिळाल्या तर खूप सोयीचे होईल.”
सारणीतील हा उपक्रम फक्त रोजगाराचं साधन नाही तर आदिवासी समाजाचा अभिमान व परंपरा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. शासनाने जर आवश्यक सुविधा दिल्या तर हा उपक्रम आणखी प्रभावी व यशस्वी ठरू शकतो.