वधना–निकणे ब्रिजवरील रस्ता वाहून गेला; नागरिकांचा संपर्क तुटला

वधना–निकणे ब्रिजवरील रस्ता वाहून गेला; नागरिकांचा संपर्क तुटला

अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी

तलासरी :- डहाणू तालुक्यातील वधना–निकणे ब्रिजवरील रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला असून, त्यामुळे या परिसरातील सुमारे सात गावांचा संपर्क तुटला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.
हा ब्रिज निकणे, रणकोळ, दाभोण, वधना, उर्से, साये आणि म्हसाड या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे आता नागरिकांना निकणे–पिंपळशेत ब्रिजवरील पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र हा मार्ग लांब, खर्चिक आणि असुविधाजनक असल्याने शेतकरी, शालेय विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे नागरिक तसेच रुग्णवाहिका चालक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे कठीण झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
१९ ऑगस्ट रोजी या ब्रिजवर नदीचे पाणी संपूर्ण दिवस-रात्र साचून राहिले. पाणी ओसरल्यानंतर रस्त्यावरील डांबराचा थर पूर्णपणे उखडून गेला आणि वाहतूक बंद झाली. ग्रामस्थांच्या मते, मागील वर्षीच या रस्त्याची दुरुस्ती झाली होती; मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पहिल्या पावसातच रस्ता नादुरुस्त झाला.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, दरवर्षी रस्त्यांची कामे कंत्राटी तत्त्वावर केली जातात, पण त्याची गुणवत्ता तपासली जात नाही. त्यामुळे काही महिन्यांतच रस्ते उखडून जातात. यापूर्वीही या ब्रिजवरून दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. “आता अजून किती बळी द्यायचे आहेत?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे.

ग्रामस्थांची मागणी

वधना–निकणे ब्रिज तातडीने दुरुस्त करून उंच करावा.

रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

पर्यायी रस्त्याची देखील दुरुस्ती करावी.

नागरिकांचे मत

सुधीर शंकर घाटाळ, निकणे ग्रामस्थ:
“प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार मनमर्जीने निकृष्ट कामे करतात. त्यामुळे रस्ते लवकरच उखडतात आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आम्ही वारंवार मागणी केली, पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.”

सुदाम मेरे, उपसरपंच – निकणे ग्रामपंचायत:
“हा ब्रिज ग्रामस्थांसाठी जीवनरेखा आहे. शाळकरी मुलांसह नागरिक दररोज या रस्त्याने प्रवास करतात. त्यामुळे हा ब्रिज उंच करून तातडीने दुरुस्त करण्यात यावा. अन्यथा लोकांचे हाल अधिक वाढतील आणि आम्हाला आंदोलन करावे लागेल.”
सध्या हा ब्रिज दुरुस्त होईपर्यंत सात गावांचा संपर्क केवळ पर्यायी रस्त्यावरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.