रस्त्याच्या कामात नियोजनाचा अभाव असल्याने शहर गेलं खड्ड्यात, कल्याणमधील निकृष्ट कामावर मनसे आमदार राजू पाटील 

 कल्याण :- सध्या डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्लूडी) रस्ते विकासाचं कामं सुरु आहे. मात्र, पाण्याचा निचरा करण्यासाठी कलवर्टचं नियोजनच नसल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलाय. रस्त्याच्या कामात नियोजनाचा अभाव असल्याने रस्त्यात कुठेच कलवर्ट नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय. हे दाखविण्यासाठी स्वतः आमदार राजू पाटील रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून शहराला खड्ड्यात टाकण्याचं काम सुरु असल्याची टीका केली.

डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सुयोग हॉटेल ते पेंढरकर कॉलेज रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. पीडब्लूडी विभागाकडून हे काम केले जात आहे. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली होती. रस्त्याचं काम होत असल्यानं रस्त्याची उंची वाढत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आजूबाला पाण्याचा निचरा होण्यासाठी कलवर्टची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी व्यवस्थाच नसल्याची तक्रार नागरिकांनी केलीय. तसेच कलवर्ट नसतील तर पाण्याचा निचरा कसा होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरिकांनी आमदार राजू पाटील यांच्याकडेच यावर उपाययोजना करण्याची मागणी केलीय.

मनसे आमदार राजू पाटील यांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी केली. पाहणी दरम्यान कुठेही कलवर्टचे काम सुरु नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राजू पाटील यांनी रस्ते विकास कामात नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केलाय. तसेच रस्त्यावर कलवर्ट कोठे करायचे हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत, असंही नमूद केलं. प्रशासनाचं काम नियोजन शून्य असून केवळ काम उरकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

पाण्याचा निचरा झाला नाही, तर अनेक समस्या उद्भवतील. रस्त्याचे काम करताना त्यासाठी आधी रस्ता पूर्णपणे खोदून नंतर त्यावर भराव टाकला गेला पाहिजे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच एकावर एक थर अंथरुन काम केलं जात आहे. रस्ता उंच झाला असून नागरिकांच्या वसाहती असलेलं शहर खाली जात चाललं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहराला खड्ड्यात टाकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here