मांडवा-गेटवे जलवाहतूक पूर्वपदावर
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: घारापुरी बेटाकडे जाणार्या नीलकमल प्रवासी बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर काही वेळासाठी विस्कळित झालेली गेटवे-मांडवा जलवाहतूक पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे नियमित जलप्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळाला. फेरी बोट, रो-रोच्या फेर्या नियमित सुरू झाल्याची माहिती बंदर विभागाने दिली आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटाकडे जाणार्या नीलकमल या फेरी बोटीला बुधवारी दुपारी उरणजवळ नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता पाहून काही प्रवासी फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अलिबागकडे येणार्या प्रवाशांनी रस्ते मार्गाचा अवलंब केला. रात्री उशिरापर्यंत गेटवे येथे मोठ्या संख्येने थांबलेल्या प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून काही प्रवासी बोटी सोडण्यात आल्या. सकाळपासून कोणत्याही व्यत्ययाशिवाय मांडवा ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची प्रवासी जलवाहतूक सुरू होती.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अलिबागकडे सागरी मार्गाने येण्याचा मुंबईतील अनेकजण बेत आखत आहेत. या प्रवासात कोणतीही बाधा येणार नाही, असे प्रवासी सेवा पुरवणार्या कंपन्यांचे म्हणणे आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी जलमार्गाने लाखो प्रवासी अलिबागमध्ये दाखल होतात. येणारी प्रत्येक बोट तुडुंब भरलेली असते. शेवटच्या दोन दिवस प्रवाशांची इतकी संख्या असते, की पोलिसांनाही त्यांची तपासणी करता येत नाही.
गतवर्षी प्रवाशांच्या संख्यमुळे पोलिसांना तपासणी करताच आली नव्हती. इतर वेळेलाही प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. यावर मेरिटाइम बोर्डाने नियंत्रण आणावे, अशी मागणी प्रवासी पुन्हा करू लागले आहेत. नीलकमल बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर मेरिटाइम बोर्डाने वाहतूक कंपन्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेटवे ते घारापुरी जलमार्गावर बुधवारी अपघात झाला. अपघाताचे ठिकाण गेटवे-मांडवा जलमार्गाच्या दरम्यान येत नाही, त्यामुळे अपघातानंतर मांडवा बंदराकडे येणार्या जलवाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सुरक्षेच्या उपाययोजना आखत या मार्गावरील जलवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे.
– आशीष मानकर,
बंदर निरीक्षक, मांडवा
स्पीड बोटचालकाच्या चुकीमुळे अपघात झाला होता. स्पीड बोटीचा वेग साधारण 60 किमी प्रतितासापेक्षा जास्त होता. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच होते; परंतु तशी वस्तुस्थिती नसून या मार्गावर कोणताही धोका नाही. आगामी नाताळ आणि नववर्ष स्वागतानिमित्त येणार्यांच्या सुरक्षित प्रवासाची खबरदारी घेतली जात आहे.
– संजय भोपी, व्यवस्थापक,
पीएनपी मेरिटाइम बोट सर्व्हिसेस