वाहतूक पोलिसांच्या समयसूचकतेमुळे १२ चिमुकल्यांचे वाचले प्राण
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल: पनवेलमध्ये एका भीषण अपघाताची घटना घडली. नवीन पनवेल सिग्नलवर उभ्या असलेल्या एका स्कूल व्हॅन आणि रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूल व्हॅनचे दरवाजे लॉक होऊन मुले आत अडकून पडली होती. मात्र, पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जीवाची बाजी लावत व्हॅनच्या काचा फोडून १२ मुलांना सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नवीन पनवेल सिग्नलवर वाहने सिग्नल सुटण्याची वाट पाहत उभी होती. यावेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरने (क्र. MH 04 FP 9142) समोर उभ्या असलेल्या स्कूल व्हॅन (क्र. MH 46 BU 7123) आणि रिक्षाला (क्र. MH 46 CD 0995) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूल व्हॅन ल जबर तडाखा बसून, रिक्षाचा चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्कूल व्हॅनचे दरवाजे पूर्णपणे जाम झाल्याने त्यातील १२ शालेय मुले आत अडकून पडली आणि घाबरून आरडाओरडा करू लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून तेथे ड्युटीवर असलेले पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार तातडीने मदतीला धावले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता व्हॅनच्या खिडकीची काच फोडली आणि बाजूचे पाईप ओढून सर्व १२ मुलांना सुखरूप बाहेर काढले.
दुसरीकडे, रिक्षा चालकही रिक्षामध्ये अडकला होता. पोलिसांनी रिक्षाची फ्रंट फ्रेम ओढून आणि फुटलेली काच तोडून त्यालाही बाहेर काढले. या अपघातात रिक्षाचालक, रिक्षामधील प्रवासी आणि स्कूल व्हॅनमधील दोन मुले जखमी झाली आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी पनवेलमधील नील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरील नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी डंपर चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कौशल्य दाखवत चालकाला गर्दीतून वाचवले आणि सुरक्षितपणे पनवेल शहर पोलीस ठाण्यात रवाना केले.
या बचावकार्यात वाहतूक शाखेच्या खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली:
१) PSI जीवन शेरखाने, २) PSI तुकाराम कदम, ३) ASI भगवान तायडे, ४) HC गोटू पवार, ५) HC महेंद्रसिंह राजपूत, ६) PN सचिन शिंदे, ७) PC महेश बोरेकर आणि ८) PC नितीन सूर्यवंशी.
सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.