सुर्या प्रकल्पाच्या नावाखाली अन्याय?” उजव्या कालवा दुरुस्तीत झाडतोड व मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर”

25

कालव्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप;

विना परवाना झाडांची कत्तल केल्याचा प्रकार आला समोर 

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी पालघर
7798185755

डहाणू :- डहाणू तालुक्यातील रानशेत परिसरात सुरू असलेल्या सुर्या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पाटबंधारे विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात कालव्यालगत असलेली मोठी झाडे कोणतीही अधिकृत परवानगी व योग्य भरपाई न देता कत्तल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय, या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला आजतागायत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या गंभीर बाबींची दखल घेत आज दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी रानशेत येथील कालवा दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी पिडित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व तक्रारी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांनी आमदार निकोले यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना सांगितले की, कालवा दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. मात्र त्याबदल्यात कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी वापरात घेतल्या असतानाही अनेक वर्षे उलटून गेली तरी मोबदला मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणात आमदार विनोद निकोले यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. झाडतोड व जमिनीच्या मोबदल्याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधित विभागाकडे जाब विचारण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

या पाहणीवेळी माकपचे तालुका सेक्रेटरी कॉ. रडका कलांगडा, सरपंच ज्योती वरखंडे, ग्रामसेवक काशीनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने पिडित शेतकरी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे लढा देण्याची ठाम भूमिका व्यक्त केली.