सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार, पीडितेच्या साक्षीवरून नराधमाला जन्मठेप.
दूध घ्यायला गेलेल्या सहा वर्षाच्या मुलीवर एका 35 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना 2015 साली घडली होती. या प्रकरणात पीडित मुलीने त्या नराधमा विरोधात न्यायालयात दिलेल्या साक्षीनंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिवकुमार राणा असे त्या नराधमाचे नाव असून न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्या दंडातील चाळीस हजारांची रक्कम पीडित मुलीला देण्यास सांगितली आहे. 2015 साली ही घटना घडली तेव्हा पीडित मुलगी ही सहा वर्षांची होती. तिच्या आईने तिला दूध आणण्यासाठी दुकानावर पाठवले होते. त्यावेळी ती दूध घेऊन परत येत असताना शिवकुमार या रिक्षाचालकाने तो तिच्या वडिलांचा मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर तुला रिक्षाने घरी सोडतो असे सांगून त्याने तिला जबरदस्ती रिक्षात स्वत:सोबत पुढे बसवले. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर तो तिला जंगल रोडवर घेऊन गेला व तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही त्याने तिला मारहाण केली व तशा अवस्थेत तिला रस्त्यावर सोडून पळून गेला.
दरम्यान एका बाईकचालकाला ती मुलगी जखमी अवस्थेत दिसल्यानंतर त्याने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले व पोलिसांत कळवले. मुलीला शिवकुमारने बेदम मारहाण केली होती त्यामुळे डॉक्टरांना तिच्यावर शस्त्रक्रीया देखील करावी लागली. या दरम्यान मुलीच्या पालकांनी तिची शोधशोध सुरू केली होती तेव्हाच त्यांना पोलिसांचा फोन आला व त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.
मुलीवर शिवकुमारने केलेल्या अत्याचारांमुळे तिला तब्बल चार महिने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. मात्र यावेळी तिने शिवकुमारबाबत पोलिसांना सांगितले. तिने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी शिवकुमारचे स्केच बनवून घेतले. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता शिवकुमार मुलीला घेऊन रिक्षातून जात असताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी इतर रिक्षाचालकांच्या मदतीने शिवकुमारच्या मुसक्या आवळल्या.