अन् सीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष म्हणतात… जलद प्रश्न सोडविल्याने आला मुलाखतीचा कॉल
• सीडीसीसी बँक नोकर भरती प्रकरण
•चुकीचे प्रश्न, गुणांची फेरफार ! परिक्षार्थ्यांचे गंभीर आरोप
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 22 जानेवारी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती परिक्षेत चुकीचे प्रश्न व गुणांची फेरफार केल्याचा आरोप परभणी जिल्ह्यातील परिक्षार्थी दत्ता पौळ यांनी बुधवार, 22 जानेवारी रोजी आयोजित पत्रपरिषदेत केला.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरतीतील घोटाळ्याविरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे सदस्य मनोज पोतराजे यांनी बेमूदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी बुधवार, 22 जानेवारी रोजी उपोषण मंडपात अनेक जिल्ह्यातील परीक्षार्थींनी भेट दिली. यावेळी परीक्षार्थी दत्ता पौळ म्हणाले, बँकेच्या नोकर भरती परीक्षेत सुरुवातीपासूनच संगणाकामध्ये घोळ होता. अनेक प्रश्न चुकीचे होते व कुठल्याही प्रश्नांचा योग्य पर्याय निवडला असता थोड्या वेळाने आपोआप चुकीचा पर्याय निवडल्याचे दिसत होते. असे सर्वच परीक्षा केंद्रात मुलांच्या लक्षात येताच एका तासातच मुलांनी सहाही परीक्षा केंद्रात गोंधळ घालून आंदोलन केले होते. या परिक्षेनंतर 9 जानेवारीला प्रश्नावर आक्षेप घेण्याची वेळ देण्यात आली. परंतु, उत्तरापत्रिकेत कुठलाही बदल न करता 12 तासाच्या आत निकाल लावून शिपाई पदासाठी मुलाखतीकरिता बोलाविण्यात आले. मला लिपिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत 65 गुण असतानादेखील मुलाखतीकरिता बोलाविण्यात आले नाही. तर माझ्या मित्राला केवळ 57 गुण असताना त्याला मात्र बोलविण्यात आले. या बाबत बँकेच्या उपाध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी तुझ्या मित्राने एका तासात प्रश्न सोडवले म्हणून जलद प्रश्न सोडविल्याने त्याला मुलाखतीकरिता बोलाविण्यात आल्याचे हास्यास्पद उत्तर दिले. असा घोळ असल्याने बँकेची नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांची आहे, असे दत्ता पौळ यांनी सांगितले. पत्रपरिषदेला उपोषणकर्ते मनोज पोतराजे, राजू कुकडे व परिक्षार्थी उपस्थित होते.