सिद्धार्थनगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शुभारंभ, ६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मालकी हक्काने मिळणार

सिद्धांत
२२ फेब्रुवारी, मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे, हे हक्काचे घर मिळविण्यासाठी जो संघर्ष केला आहे, तो विसरु नका आणि हा संघर्ष वायादेखील जाऊ देऊ नका, त्यासाठी मिळालेली ही घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासीयांना घातली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवरील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ गाळेधारकांच्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागणार आहे. ६७२ मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे. म्हाडा स्वतः विकासक म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे काम करीत आहे.
पत्राचाळीतील रहिवाशांना तीन वर्षात घरे ताब्यात देणार- गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
कोरोनाचे संकट नसते तर या प्रकल्पाचा शुभारंभ यापूर्वीच झाला असता असे सांगून पत्राचाळीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुमारे ४२ बैठका घेऊन दर आठवड्याला आढावा घेतला, सतत पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून ‘म्हाडा’ वर विश्वास ठेवा, येत्या तीन वर्षात घरे ताब्यात देण्याची ग्वाही यावेळी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपल्या जमीनी कुणालाही द्यायच्या नाहीत हा निर्णय म्हाडाने घेतला असून म्हाडाच्या जमीनी उत्तमपणे विकसित करु आणि त्यातून लाखभर रहिवाशांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वासही डॉ. आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचा वृत्तांत पाहण्यासाठी आम्हाला INSTAGRAM वर आताच फॉलो करा
https://www.instagram.com/p/CaCraQjOIDo/
म्हाडाने कोविडकाळात तसेच अतिवृष्टीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करुन मध्य मुंबईत लवकरच ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. ताडदेवमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह बांधण्यात येणार असून गोरेगावमध्ये १० एकर जागेवर सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही गृहनिर्माणमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यातील मोठ्या शहरातील पुनर्विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘म्हाडा’ महाराष्ट्रभरात काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्राचाळीतील रहिवाशी सध्या भाड्याच्या घरात असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना भाडे मिळालेले नाही हे भाडे येत्या १ एप्रिलपासून नियमितपणे देणार असल्याची घोषणाही गृहनिर्माणमंत्र्यांनी यावेळी केली.