राजकीय: अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

अखेर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातातून गेले तसा निर्णयच निवडणूक आयोगाने नुकताच दिला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक असला तरी अपेक्षित असाच होता उद्धव ठाकरे यांच्या गटालाही हा निर्णय अपेक्षित होता ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनीच तसे म्हटले आहे अर्थात या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल त्यामुळे या निर्णयाचे कवित्व आणखी काही दिवस चालेल मात्र ठाकरेंशिवाय शिवसेना अशी कल्पना कोणीही केली नसेल पण राजकारणात काहीही होऊ शकते विशेषतः सध्याच्या राजकारणात तर काहीही शक्य आहे.

आधी आमदार मग खासदार त्यानंतर नगरसेवक आणि आता पक्षाचे नाव आणि चिन्हही गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या हाती काहीही राहिले नाही मात्र म्हणतात ना हातात जेंव्हा काही नसते तेंव्हाच जिद्द निर्माण होते. उद्धव ठाकरे यांनी आता ती जिद्द दाखवावी न्यायालयीन लढाई लढतानाच राजकारणाची पुढील दिशाही ठरवावी. उद्धव ठाकरे यांनी केवळ न्यायालयावर अवलंबुन राहू नये न्यायालयासोबतच त्यांनी जनतेच्या न्यायालयात जावे. जे काम इतिहासात इंदिरा गांधी यांनी केले, जे काम वर्तमानात जगनमोहन रेड्डी यांनी केले तेच काम उद्धव ठाकरे यांनी करावे.

जेंव्हा इंदिरा गांधी यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेले तेंव्हा इंदिरा गांधी यांनी इंदिरा गांधी हे पक्षाचे नवीन नाव आणि हाताचा पंजा हे नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी भारतभर फिरल्या तेच काम वाय एस आर पक्षाचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशात केले. त्यांच्याही हातून पक्ष, चिन्ह आणि आमदार खासदार गेले तेंव्हा त्यांनीही आंध्रप्रदेशात लॉंगमार्च काढला. आपला नवा पक्ष आणि नवे पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी ते घरोघरी फिरले त्यांनी ना निवडणूक आयोगावर टीका केली ना न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले कारण त्यांना माहीत होते की खरा निकाल हे जनतेच्या न्यायालयातच लागणार आहे त्यासाठी ते थेट जनतेच्या न्यायालयात गेले त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. हाती सत्ता नसताना आमदार, खासदार नसताना त्यांनी जनतेची कामे केली.

सत्ताधारी पक्षांना सळो की पळो करून सोडले परिणामी जनतेने त्यांना नेता मानले आणि पुढील निवडणुकीत सर्व विरोधात असताना एकतर्फी विजय मिळवून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनीही विरोधी पक्षांवर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा थेट जनतेत जावे. महाराष्ट्र पिंजून काढावा. जनतेची काम करावीत. रात्रीचा दिवस करावा त्यांच्या सुदैवाने महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्यामुळे क्षणाचाही वेळ वाया न दडवता त्यांनी कामाला लागावे.

निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात गेल्याने जनतेत त्यांच्याप्रती सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. ही सहानुभूती मतात रूपांतरित करण्याचे काम त्यांनी करावे. संकटाला संधी मानून काम केल्यास गेलेले वैभव पुन्हा मिळू शकते. आमदार, खासदार जरी उद्धव ठाकरे यांना सोडून गेले असले तरी कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे.

एकनिष्ठ कार्यकर्ते आणि जनतेच्या सहानुभूतीच्या जोरावर उद्धव ठाकरे राजकारणात पुन्हा मुसंडी मारू शकतात त्यासाठी हवी ती जिद्द. ती जिद्द उद्धव ठाकरे यांनी दाखवली तर जगमोहन रेड्डी यांनी जे काम आंध्रप्रदेश मध्ये केले तेच काम उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here