मी वेदनेचं गीत गातोय

51
मी वेदनेचं गीत गातोय…..
साहित्यिक/ कवी मृत्यू कार विनोद अहिरे
आज कोरोनाची इतकी भयंकर परिस्थिती आहे, की संपूर्ण कुटुंबचे कुटुंब बाधित होत आहेत, त्याला पोलिस दल ही अपवाद नाही. त्यावरच जळगाव जिल्हा पोलिस दलातील साहित्यिक/ कवी विनोद अहिरे यांनी लिहिलेली अत्यंत वास्तवदर्शी कविता.

 I am singing a song of pain .....

मी वेदनेचं गीत गातोय…..
माझ्या पिस्टलची लेखणी होऊन 
मी लिहीत जातोय वेदनेचं गीत.. 
माणसांच्या जीवाचे दान घेऊन 
दिवसेंदिवस भडकत 
चाललाय हा मृत्यू कुंड.. 
घराघरातून वाहली जातेय 
त्यात आक्रोशाची समिधा..
हे काय दिवसेंदिवस 
हा तर रौद्ररूप धारण करतोय्
काही बानगुडं 
आपल्या स्वार्थाचं 
घासलेट ओतून 
आणखी भडकवताय् 
या मृत्यू कुंडाला
पण….
 त्यांच्या सडक्या मेंदूला 
माहित नाही कि,
त्या मृत्यू कुंडाच्या अग्निज्वाला 
त्यांच्या घरापर्यंत येतील आणि 
घेतील आपल्या कवेत 
त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला 
मी ही सैरभैर झालोय् 
 या मृत्यू भुजंगाच्या
विषारी फुत्कारांनी 
माझ्यासह घायाळ झालाय 
माझं अख्ख कुटुंब
माझी जीवनसंगिनी 
रुग्णशय्येवर पडून 
मोजत बसलीय्
एक एक श्वास 
तिकडे माझ्या सानुल्यांनाही 
विळखा घातलाय्
या मृत्यु भुजंगाने…
 मी काय करू 
माझ्या सानुल्यांना 
या मृत्यू तांडवातून 
बाहेर काढू कि, 
माझ्या अर्धांगिनीच्या 
तुटणाऱ्या श्वासाच्या 
दोरीला गाठ मारू…
का मायभूमीच्या 
रक्षणाची संधी 
मिळाली म्हणून 
शिंपडून टाकू या 
मृत्यू कुंडावर 
माझ्या शरीरातील 
वेदनेनं थंड झालेलं रक्त…
मग काय?
देशभक्तांच्या व्हाट्सॳॅप डीपी
फेसबुक प्रोफाईल वर
झळकतील माझे फोटो
माझ्या तसबिरी भोवती 
पेटतील निरांजनाच्या वाती
आणि वेदनेचं अखंड 
गीत गात राहील 
माझ्या देहाची झालेली माती…
पोलीस नाईक विनोद अहिरे 
पोलीस मुख्यालय जळगाव
9823136399