सांताक्रूझ कालिना मध्ये होतेय नागरीकांकडून पाण्याची चोरी? एकाचे पाणी विना परवाना दुसरीकडे वळवण्याचा प्रकार…

45

सांताक्रूझ कालिना मध्ये होतेय नागरीकांकडून पाण्याची चोरी? एकाचे पाणी विना परवाना दुसरीकडे वळवण्याचा प्रकार…

मीडियावार्ता
२२ एप्रिल,सांताक्रूझ: गेल्या कित्येक दिवसांपासून सांताक्रूझ, एच वॉर्ड परिसरामध्ये पाण्याचा पुरवठ्यात कमी होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात बीएमसीकडे वारंवार तक्रार करून सुद्धा पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता.

सांताक्रूझ, एच वॉर्ड परिसरामध्ये पाणी कपात का होत असावी यासंदर्भात चौकशी करत असताना परिसरातील सुजाण नागरिक दयानंद सावंत यांना एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. कालिना गावातील काही नागरिक बेकायदेशीर रित्या पाणी आपल्याकडे वाळवून घेत असल्याचे दृश्य त्यांना पाहायला मिळाले. बीएमसीच्या परवानगीविना पाईपलाईनची बनावट चावी बनवून कालिना गावातील काही नागरिक सांताक्रूझ, एच वॉर्ड साठी येणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व्ह बंद करून ते पाणी कालिना गावात फिरवत होते. दिवसाढवळ्या पाणी पळवण्याचा हा बेकायदेशीर प्रकार होत असल्याने यात घोटाळ्यात स्थानिक बीएमसी अधिकारी सहभागी असावेत याची दाट शंका परिसरातील नागरिकांना येत होती.

 

दयानंद सावंत यांनी अखेर या बेकायदेशीर कारवाईबद्दल बीएमसीमध्ये पुराव्यासह तक्रार दाखल केली. सोबत दिलेले पुरावे बघून बीएमसीद्वारे या तक्रारींवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. दयानंद सावंत यादरम्यान सतत या प्रकरणाचा आढावा घेतला. सांताक्रूझ, एच वॉर्ड परिसरामध्ये पाणी कपातीचे कारण शोधून जबाबदार व्यक्तींना धारेवर धरण्याचे काम करणाऱ्या दयानंद सावंत यांचे परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.