‘कोरोना लसीच्या कमतरतेला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा खळबळजनक आरोप.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.21 मे:- देशात आणि राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा कमतरता असल्यामुळे राज्यातील लोकांना लस मिळत नसल्याचे समोर येत आहे. अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. अशात लसीच्या तुटवड्याला एक प्रकारे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने खळबळजनक आरोप केला आहे.
केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर विचार न करताच 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं आहे.
देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या गोष्टींचं आणि नियमांचं पालन करायला हवं आणि त्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यायला पाहिजे. आपण एखाद्या वस्तूची उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे, असं सुरेश जाधव म्हणाले. लसीकरण गरजेचं आहे. मात्र लसीकरणानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहायला हवं आणि कोरोनापासून बचावासाठी सर्व नियमांचं पालन करायला हवं, असंही सुरेश जाधव यांनी म्हटलं आहे.