मुक्त पत्रकारांना दरमहा ₹१०,००० पेन्शन द्यावी – राष्ट्रवादी कामगार युनियनची मागणी
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016
मुंबई :- राज्यातील मुक्त, ई-पेपर आणि वेब पोर्टलवर कार्यरत पत्रकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, सरकारने त्यांना दरमहा ₹१०,००० पेन्शन द्यावी, अशी जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी युनियनची नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. यात रमेश औताडे (अध्यक्ष), नरेंद्र घोलप (उपाध्यक्ष), शिरीष वानखेडे (महासचिव), सुरेश गायकवाड (सचिव), अल्पेश म्हात्रे (संघटक चिटणीस), तसेच सदस्य म्हणून सुरेश ढेरे व सुबोध शाक्यरत्न यांचा समावेश आहे. देसाई म्हणाले, “अनेक अनुभवी, सुशिक्षित पत्रकार सध्या स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना ना नियमित नोकऱ्या मिळतात ना कंत्राटी संधी. त्यामुळे अनेकांना वेब पोर्टलसाठी लेखन करून अत्यल्प मानधनावर समाधान मानावे लागत आहे.”