बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची बंडखोरी

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची बंडखोरी

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची बंडखोरी

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – एकनाथ शिंदे साहेब एका टेलिफोनीक इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले की त्यांच्या बरोबर 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. हे खरं असेल आणि त्यातील इतर पक्षातील फुटलेले सोडले तरी शिवसेनेचे जवळजवळ 70% पेक्षा जास्त आमदार पक्षाच्या विरोधात आहेत? ही खरच खेदाची बाब आहे!

बाळासाहेबांचा एक निस्सीम चाहता म्हणून, शिवसेनेची प्रगती आणि वाढ ह्यांचा साक्षीदार असलेला एक सामान्य नागरिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, एक हिंदू म्हणून आज जे चित्र समोर येतंय ते खरच विदारक वाटत आहे.

शिवसेना म्हटलं की आम्हाला आठवतो तो बाळासाहेबांचा दरारा, शान आणि वचक. त्यांच्या शब्दाला आदेश मानून जीव द्यायला आणि घ्यायला तयार असलेले शिवसैनिक. शिवसेनेचा बंद असेल तर शहरातील मोकळ्या पडलेल्या मुख्य रस्त्यावर क्रिकेट खेळत असलेले आम्ही. मार्मिक मधील बाळासाहेबांचे लेख आणि व्यंगचित्र. तो दसरा मेळावा. त्या सभा. त्यात बाळासाहेब बोलत असलेली ठाकरी भाषा जी सर्वांच्या अंगात चैतन्य निर्माण करत असे आणि धमन्यात रक्त उसळू लागत असे. सेनेच्या शाखा. तिथे जमणारे आणि तिथेच न्याय करणारे शाखाप्रमुख, विभाग प्रमुख. शाखेत होणाऱ्या सत्यनारायण पूजा आणि स्पीकर वर लागणारी जयजय महाराष्ट्र माझा आणि वेडात मराठे वीर दौडले सात अशी गाणी! साहेबांना कुर्निसात करायला गेलेला मुजोर मियाँदाद. वानखेडेच पिच उखडणारे शिशिर शिंदे. आमचे गिरगावकर प्रमोद नवलकर. ते राडे. त्या दंगली. स्थानीय लोकाधिकार समिती. साहेबांना असलेला धोका आणि त्यांच्याभोवती शिवसैनिकांनी बांधलेला आपल्या जीवाचा कडेकोट किल्ला! शर्ट पॅन्ट घातलेले शिडशिडीत शरीराचे चष्मा लावलेले साहेब ते पांढरा कुर्ता पैजामा आणि शाल ल्यालेले साहेब ते भगवी वस्त्र, दाढी आणि रुद्राक्ष माळ धारण करणारे साहेब हा प्रवास! रूप कोणतंही असलं तरी साहेबांचा आवाज ऐकला की कानात प्राण आणि हातात जीव घेऊन आदेश ऐकायला तयार असलेले शिवसैनिक. आणि आठवतो “आवाज कुणाचाssss” हे ऐकल्यावर “शिवsss सेनेचाsss” असे मनापासून तोंडून बाहेर पडणारे माझ्यासारखे लाखो सामान्य लोक.

त्यावेळी “शाखेत तक्रार करेन” हे वाक्य जवळजवळ सुप्रीम कोर्टात केस दाखल करेन इतकं परिणामकारक होतं. बाळासाहेब आणि शिवसेना हे अन्याय होत असलेल्याना इन्स्टंट न्याय मिळवून देणारी समांतर व्यवस्था बनले होते. मराठी माणसाला तारणहार असलेली शिवसेना पुढे हिंदूंची रक्षक झाली आणि बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट झाले! देशभर हिंदुत्व अजेंडा राबवणार्या भाजपला सुद्धा महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा भाऊ मानून सत्ता स्थापन करावी लागली. हा करिष्मा होता बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा, त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि शिवसैनिकांच्या त्यांच्यावरील विश्वासाचा! ह्यातील सर्वात महत्वाचा आणि मजेचा भाग म्हणजे बाळासाहेब स्वतः कधीच सरकारच्या कोणत्याही पदावर बसले नाही. पण प्रत्येक पदावर त्यांचा रिमोट कंट्रोल नियंत्रण ठेऊन होता. आणि बाळासाहेब ते खुलेआमपणे सांगत देखील. ते किंग मेकरच राहिले. स्वतः किंग बनायचा प्रयत्न कधीच केला नाही. आणि हेच बाळासाहेबांच वेगळेपण लोकांच्या आणि शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर, कुतूहल, प्रेम वृद्धिंगत करत राहिले!

आज बाळासाहेबांची खूप आठवण येते आहे. त्या वेळची शिवसेना आठवते आहे. गुलाल उधळत जल्लोष करणारे शिवसैनिक आठवत आहेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन शब्द ऐकल्यावर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या आधार, आदर, दहशत, प्रेम, अभिमान, आपुलकी, हक्क, हिम्मत, न्याय अश्या सर्व भावना आठवतात. सभास्थानी साहेबांच आगमन झाल्यावर धडाडणाऱ्या फटाक्यांच्या लडी आठवतात. त्या धुरातून स्टेजवर येणारे साहेब आठवतात. साहेब भाषणाला उभे राहिले की वाजणारी तुतारी आणि “माननीय शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट….” अशी घोषणा आठवते. शिवतीर्थावर भाषण करणारे साहेब आठवतात. त्या जनसागरात हरवलेला मी आठवतो. आणि आठवते सत्तेत नसूनही लोकांच्या मनावर राज्य करणारी, सरकारला झुकवू शकणारी शिवसेना नावाची संघटना. सत्तेत आल्यावर देखील संघटना जिवंत ठेवणारे बाळासाहेब. त्यांचं नेतृत्व, रुबाब आणि जरब! आणि आज आपोआप डोळे पाणावतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here