महाराष्ट्र बिघडतोय, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहाटे कामावरून घरी परतणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली. अर्थात महिला अत्याचाराची ही राज्यातील ही पहिली घटना नाही दररोजच्या वर्तमानपत्रात महिला अत्याचाराची एक तरी घटना हमखास वाचायला मिळते याआधी मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीची सुरक्षा राक्षकाने हत्या केल्याची बातमी आली ती बातमी ताजी असतानाच पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनींची हत्या झाल्याची बातमी आली. मुंबईतही छत्रपती शिवाजी टर्मिनसहुन वाशिकडे हार्बर रेल्वेने परीक्षेसाठी येणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर नवाजू करीम शेख या नाराधमाने मज्जीद बंदर जवळ धावत्या डब्यातच लैंगिक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. अन्य प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी त्याला चार तासात अटक केली.
याबाबत रेल्वे पोलिसांचे अभिनंदनच करायला हवे. रेल्वे पोलिसांनी देखील याबाबत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. स्वतःचे कौतुक करून घेण्याचा त्यांचा अधिकारच आहे मात्र महिला अत्याचाराच्या घटना घडून गेल्यानंतर आरोपींना पकडून शिक्षा देण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. दिवसाढवळ्या महिलांची अब्रू लुटून त्यांची हत्या करण्याची नाराधमी प्रवृत्ती अलीकडे जोर धरू लागली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिंमत नराधमांमध्ये निर्माण होते याचाच अर्थ या नराधमांना कायद्याचा आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नाही. आपण कितीही मोठा गुन्हा केला तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही. पैशाच्या जोरावर आपण कायदा आणि सुरक्षा यंत्रणांना आपण वाकवू शकतो अशीच धारणा या नराधमांची झाली आहे म्हणूनच ते असे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करत आहे.
https://mediavartanews.com/2023/06/17/history-of-tajmahal-in-marathi/
फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना शोभणीय नाहीत. पुरोगामी महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणाऱ्या या घटना आहेत. महिलांकडे उपभोगी वस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी मानसिकता वाढू लागली आहे हीच मानसिकता यामागे कारणीभूत आहे. आज राज्यातील कोणत्याच महिला सुरक्षित नाही मग ती तीन वर्षाची चिमुरडी असो की सत्तर वर्षाची आजी. शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, सार्वजनिक वाहन, स्वतःचे घर इतकेच काय तर पोलीस स्टेशन देखील महिलांसाठी सुरक्षित नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे.
पूर्वी अशा घटनांसाठी बिहार आणि उत्तरप्रदेश ही राज्ये प्रसिद्ध होते आता त्यात महाराष्ट्राची भर पडते की काय अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार उत्तरप्रदेश होऊ नये यासाठी सरकारने आणि पोलीस दलाने महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात तसेच संबंधित गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी तसे झाले तरच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल आणि पुरोगामी महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख कायम राहील.
https://mediavartanews.com/2023/06/12/savitribai-phule-information-2/