हत्तीरोगींना मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र
रायगड जिल्हयात हत्तीरोगाचे २२९ रुग्ण अलिबाग,पनवेल मध्ये सर्वाधिक
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३
अलिबाग :- हत्तीरोग हा डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होतो. दुर्लक्षित असलेले्या या आजाराच्या ठराविक वृध्दीनंतर रुग्णांच्या हालचालींवर कमालीची बंधने येतात. त्यामुळे तो मुक्तपणे हिंडू- फिरु शकत नाही. अशा रुग्णांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हत्तीरोगींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. रायगड जिल्हयात हत्तीरोगाचे २२९रुग्ण आहेत. सर्वाधिक रुग्ण अलिबाग आणि पनवेल तालुक्यात आहेत.
हत्तीरोग हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार आहे. हत्तीरोगाच्या रुग्णांच्या पायावर सूज येऊन हालचालींवर एका प्रकारचे निर्बंध येतात. इतरांच्या मदतीशिवाय हे रुग्ण हालचाल करु शकत नाही. पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सूजेवरुन तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २२९रुग्ण आहेत. ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या हत्तीरोग रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. सीएससी सेंटरवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी रुग्णास आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह रक्त गट, मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. शिबिरास येताना ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत सोबत आणणे गरजेचे आहे.
चाैकट-
रायगडमधील हत्तीरोग रुग्णांची संख्या
अलिबाग- ५६, उरण- ३१, पनवेल- ४७, कर्जत- ७, खालापूर- ९, सुधागड- ५, पेण – २८, मुरुड- १२, रोहा- ११, माणगाव- १२, तळा- १, म्हसळा- १, श्रीवर्धन- १, महाड- ४ , पोलादपूर- ४, एकूण- २२९.
चाैकट-
डास चावल्यामुळे हत्तीरोग
‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्लुलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत ‘बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया’ या परजीवी जंतूंचा प्रसार करतात. क्लुलेक्स प्रजातीचे डास हत्तीरोगासाठी कारणीभूत ‘बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया’ या परजीवी जंतूंचे वाहक असतात. हा परजीवी वाहक डास मानुष्याला चावल्यानंतर हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या शरीरात सोडतो. माणसाच्या शरीरात हे जंतू चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर मायक्रोफायलेरिया रक्तात सापडण्याच्या निश्चित कालावधीबाबत माहिती नाही. पण, हत्तीरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर लक्षणं दिसून येण्यासाठी साधारणत: ८ ते १६ महिन्यांचा कालावधी लागतो.
चाैकट-
हत्तीरोगाची लक्षणे
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात. जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणं दिसून येऊ शकतात.
लक्षणविरहीत किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. तीव्र लक्षण अवस्थेत- ताप येतो, लसीकाग्रंथींचा दाह सुरू होतो. लसीकाग्रंथींना सूज येते किंवा पुरुषांमध्ये वृषणदाह सुरू होतो. दीर्घकालीन संसर्गावस्थेत, हात, पाय आणि बाह्य जननेंद्रीयांमध्ये सूज येते.
कोट-
वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे हत्तीरोगाच्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून ज्याचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा जास्त आहे, त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
-राजाराम भोसले. जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड