भिवंडीमध्ये एकाच दिवसात दोन अपघात आणि तीन घरांवर कोसळले दुःखाचे डोंगर

भिवंडीमध्ये एकाच दिवसात दोन अपघात आणि तीन घरांवर कोसळले दुःखाचे डोंगर

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076

भिवंडी : भिवंडी शहरात गेल्या २४ तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकीकडे कामवारी नदीत स्नान करताना दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला, तर दुसरीकडे रस्ते अपघातात दोन मित्रांनी आपला जीव गमावला.पहिली हृदयद्रावक घटना भिवंडीजवळील गोरसई गावात घडली. शुक्रवारी सागर धुमाल (३०) आणि अक्षय धुमाल (२५) हे दोघे सखे भाऊ नदीत आंघोळीसाठी गेले होते. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, नदीच्या जोरदार प्रवाहात दोघेही वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी
अग्निशमन विभाग आणि तहसील कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. परंतु अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवावी लागली. तसेच शनिवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू झाली आणि दोघांचे मृतदेह जवळपास एक किलोमीटर अंतरावर सापडले. भिवंडी तालुका पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे पोस्टमार्टमसाठी पाठवले. दुसरी घटना शुक्रवार संध्याकाळी नमाजेनंतर घडली. गैबी नगर येथील मोहम्मद असद आफताब आलम आणि अंसार नगरचे आजम सईद अन्सारी हे दोघे मित्र मोटरसायकलवरून मुंब्राकडे जात होते. खारेगाव पुलाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते दोघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना कलवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून सध्या नारपोली पोलीस ठाणे या प्रकरणाची चौकशी करत आहे. या दोन्ही घटनांमुळे भिवंडी शहरात शोककळा पसरली असून संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शोकमग्न नातेवाईकांना समजवणे कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे नदीकाठची सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि रस्त्यावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे. याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.