तालिबानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानवर कब्जा

इस्लामिक कट्टरवादी नेते? धर्मांध अफगाणी जनता? अफगाणिस्तानचा युद्धभूमिसारखा वापर करणारी अमेरिका आणि रशिया? कि भ्रष्टाचारी अफगाणी राजकारणी?

taliban american war in Afghanistan
तालिबानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानवर कब्जा

 

सिद्धांत 

मुंबई: तारीख १८ सप्टेंबर २००१. अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज बुश अमेरिकन काँग्रेस समोर बोलत होते.  आठवड्यापूर्वीच म्हणजे ११ सप्टेंबरला ओसामा बिन लादेनने न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर हल्ला केला होता. त्यात जवळपास तीन हजार निष्पाप अमेरिकन नागरिक मारले गेले होते. या दहशतवादी हल्याविरोधात अमेरिकेचे उत्तर काय असेल याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून होते. यावेळी जॉर्ज बुश यांनी एक घोषणा केली.

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ग बुश अमेरिकन काँग्रेस समोर बोलताना

९/११ चा हल्ला घडवून दहशतवाद्यांनी शांतताप्रिय अमेरिकन लोकांच्या जीवनाला भयंकर धोका निर्माण केला आहे. आज मी जाहीर करतो कि,यापुढे जगातील दहशतवादी गट आणि त्यांना आसरा देणाऱ्या देशांचा बिमोड करण्यासाठी अमेरिका आपल्या बलाढ्य सैन्याचा वापर करेल. पुढच्याच महिन्यात ओसामा बिन लादेन तळ ठोकून बसलेल्या अफगाणिस्तानावर अमेरिकन सैन्याने जबरदस्त हमला केला. डिसेम्बर २००१ पर्यंत लादेनसह अनेक दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून बाहेर हुसकावून लावलं. पुढची २० वर्ष आपल्या लष्करी ताकतीच्या जोरावर जवळपास २ लाख करोड खर्च करून अफगाणिस्तानमध्ये लोकशाही शासनप्रणाली, आधुनिक समाजव्यवस्था उभी करण्याचा अमेरिकेने पुरेपूर प्रयत्न केला. पण ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिकन सेन्याने माघार घेताच वीस वर्षांपूर्वी हुसकावून लावलेल्या याच तालिबानी दहशतवाद्यांनी अवघ्या १०-१५ दिवसात संपूर्ण अफगाणिस्तानवर आपली सत्ता प्रस्थापित केली.

कोण आहेत हे तालिबानी?

१९७८ साली पीपल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान या सुधारणावादी पक्षाचं सरकार अफगाणिस्तानमध्ये स्थापित झालं. या सरकारने जाचक पारंपरिक इस्लामिक कायदे मोडीत काढले आणि देशामध्ये आधुनिकीकरणाला सुरुवात केली. त्यांनी इस्लामिक धर्मसत्तेला राज्यसत्तेपासून दूर केले, मोठया प्रमाणावर साक्षरता मोहीम राबवण्यास सुरुवात केली. स्त्रियांना  कायद्याने शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या. इस्लामिक शारिया कायदा रद्द करण्यात आला. भूसंपादनाचे नवीन कायदे करून भूमिहीनांना शेत जमिनी वाटण्यात आल्या. परंतु बहुसंख्य अफगाणी जनतेला हे नवीन कायदे  इस्लामविरोधी असल्याने मान्य नव्हते. विशेषतः शहरांपासून दूर दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना, जे स्थानिक मुस्लिम धर्मगुरूला आपला नेता तर इस्लामिक शारिया नियमांना आपला कायदा मानत असत. अश्या इस्लामिक कट्टरवाद्यांचे शेकडो गट अफगाणिस्तानच्या विविध प्रांतामध्ये तयार झाले आणि इथूनच मुजाहिद्दीन, तालिबान आणि अल-कायदा सारख्या दहशतवादी गटांचा उगम सुरु झाला. आपल्या धोरणांना विरोध करणाऱ्या या गटांतील लोकांना सरकारने थेट मृत्यूदंडासारख्या गंभीर शिक्षा सुनावल्या. त्यामुळे या सरकारविरोधात अफगाणी जनतेमध्ये असंतोष वाढत गेला. १९७९ मध्ये सोविएत युनिअनच्या सैन्याने अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती हाफिझउल्लाह अमीन यांची हत्या केली आणि अफगाणिस्तान देशावर ताबा मिळवण्यासाठी आपल्या पसंतीच्या बाबरक करमाल याना राष्ट्रपती बनवलं. इथून तालिबानच्या खऱ्या रक्तरंजित इतिहासाला सुरुवात झाली.

रशियन सैन्याचा अफगाणिस्तानमध्ये प्रवेश

रशियन  सैन्याने अफगाणिस्तानमधील शहर, सेनिकी तळ आणि प्रशासकीय यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली. अफगाणिस्तानच्या पारंपरिक झेंडा बदलून रशियन पद्धतीच्या नव्या झेंड्याला मान्यता दिली. अफगाणी दहशतवाद्यांची गावच्या गाव उध्वस्त करून टाकली. त्यांच्या शेतजमिनी हानिकारक रसायने फवारून नापीक केल्या. ठिकठिकाणी भूसुरुंग पेरले गेले.केद्याना सामूहिक मृत्युदंडाच्या शिक्षा देण्यात आल्या. एक दशक चाललेले हे युद्ध इतकं रक्तरंजित होत की त्यात जवळपास २० लाख अफगाणी लोकांनी आपले प्राण गमावले. योग्य सैनिकी प्रशिक्षण आणि युद्धसमुग्रीचा अभाव यामुळे सुरुवातीला  अफगाणी दहशतवाद्यांची या युद्धात पिछेहाट होत होती. मग अमेरिका तालिबानी दहशतवा्यांच्या मदतीसाठी धावून आली.

अमेरिका – रशियातील शीतयुद्ध अफगाणिस्तानच्या भूमीवर.

रशियाने अफगाणिस्तानावर कब्जा केल्यास संपूर्ण मिडल ईस्टवर त्यांचा दबदबा वाढू शकतो, याची अमेरिकेला भीती होती. म्हणून रशियाविरुद्ध  लढणाऱ्या अफगाणी दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या मदतीने अमेरिकेने आधुनिक शस्त्रसामुग्री आणि जवळपास २० बिलियन डॉलर्सची आर्थिक मदत केली. तत्कालीन अमेरिकन मीडियामध्ये अफगाणी दहशतवाद्या संदर्भात सहानुभूतीचे  वातावरण तयार झाले होते. अमेरिकेसह इंग्लंडनेही त्यांना आधुनिक सैनिकी प्रक्षिशन दिलं. चीनने त्यांना करोडो रुपयांचे मिसाईल लॉचर्स, रॉकेट्स,बंदुका पुरविल्या. या मदतीच्या जोरावर अफगाणी दहशावाद्यानी रशियन सैन्याला जोरदार टक्कर दिली. अखेर १९८९ च्या सुमारास रशियन सैन्याला अफगाणिस्तानमधून माघार घ्यावी लागली आणि अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदा तालिबान्यांची सत्ता प्रस्थापित झाली. रशियाने माघार घेतल्यानंतर  मात्र अमेरिकेने अफगाणिस्तानकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि याचा गंभीर परिणाम अमेरिकेला आणि जगाला भोगावा लागला.

तालिबानी दहशतवाद.

तालिबान या शब्दाचा पश्तून भाषेमध्ये अर्थ आहे ‘शिष्य’. शिष्याला चुकीचा गुरू मिळाल्यास त्याची अधोगती होते. अफगाणिस्तानमधील कित्येक पिढ्याच्या बाबतीत हेच घडले. १९९६ मध्ये तालिबानीनीं अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं आणि अफगाणिस्तानला इस्लामिक देश घोषित केल. मुस्लिम शारिया कायदा प्रमाण म्हणून मानण्यात आला. त्यानुसार स्त्रियांना शिक्षण आणि नोकरी करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यांच्यावर बुरखा घालने सक्तीचे करण्यात आले. शारिया कायदे मोडणाऱ्या नागरिकांना भर चौकात मृत्युदंडाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. या कालावधीत अन्नधान्य,औषध यासारख्या गोष्टी सामान्य अफगाणी लोकांना पुरवणाऱ्या आंतर्राष्ट्रीय सामाजिक संस्थांच्या कामात प्रचंड अडथळे आणले. पाश्चात्य संगीत,सिनेमा, प्रसारमाध्यम यावर बंदी घातली. आतातर या कट्टरवाद्यांकडे आधुनिक शस्त्रात्रं असल्याने अफगाणिस्तानच्या त्याकाळी घडलेला नरसंहार हा कल्पनेच्या पलीकडचा होता.

काबूलमध्ये तालिबान्याची सत्ता असली तरी त्यांच्या अखत्यारीत अनेक छोटे-मोठे दहशतवादी गट अफगाणिस्तान आणि उत्तर पाकिस्तानमध्ये कार्यरत होते. त्यापैकी एक होता ओसामा बिन लादेनचा अल-कायदा हा गट.

वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील दहशतवादी हल्ला

अमेरिकेने रशिया बरोबरच्या शीतयुद्धात अफगाणिस्तानचा युद्धभूमी म्हणून वापर केला आणि आपल्या देशाला उध्वस्त केले असा असंतोष  बहुतांश अफगाणी नागरिकांमध्ये होता. या असंतोषाला कट्टर मुस्लिमावादाची जोड देत अल-कायदा सारखा दहशतवादी गट लोकप्रिय झाला. ओसामा बिन लादेनने इथूनच अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला घडवून आणला.

२० सप्टेंबरला अमेरिकेने तालिबानी सरकारला ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या हवाली करण्याचा आदेश दिला, परंतु अनेक अति, शर्थी  घालत तालिबान्यांनी लादेनला सुपूर्त करण्यास टाळाटाळ केली. अखेर ७ ऑक्टोबर २००१ रोजी अमेरिकेने आपल्या सैन्यासह तालिबानी अफगाणिस्तावर हल्ला चढविला.

अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील २० वर्षाचं युद्ध.

अमेरिकन सैन्याने गुप्तचर यंत्रणांचा साहाय्याने लष्कराद्वारे तर कधी ड्रोनचा वापर करून अनेक तालिबानी नेत्यांना ठार केले. इंग्लंड सेन्याच्या आणि नाटो सैन्याच्या मदतीने दशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर हवाई हल्ले करून उध्वस्त केले. अमेरिकेच्या सेन्यापुढे तालिबानींचा टिकाव लागला नाही आणि डिसेंबर २००१ पर्यंत लादेनसह अन्य तालिबानी दहशतवादी उत्तर पाकिस्तानमध्ये पळून गेले. त्यानंतर अमेरिकन सैन्याने काबुलच्या उत्तरेकडील बगाराम हवाई तळाला आपलं मुख्य केंद्र बनवल आणि २०२१ पर्यंत इथूनच अफगाणिस्तानमधील शासकीय, सामाजिक, लष्करी व्यवस्थावर आपलं नियंत्रण ठेवलं. २००४ मध्ये अफगाणिस्तानमध्ये नवीन सुधारणावादी  संविधान मंजूर करण्यात आले. त्यानुसार ऑक्टोबर २००४ मध्ये अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक निवडणूक लढवली गेली आणि हमीद करझाई लोकशाही मार्गाने पहिले राष्ट्रपती बनले. अमेरिकेच्या मदतीने युन, नाटो, विविध मानवी संघटना गेली २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये विकसित समाजजीवन उभारण्याचं काम करत होते.

परंतु बंदुकीच्या धाकाने जनतेला कायमच आपलंस करता येत नाही हे अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील २० वर्षाच्या वास्तव्यावरून कळून येत. कट्टरवादी अफगाणी लोक अजूनही लपूनछपून तालिबानी लोकांना साहाय्य करत होते. त्यांना आपल्या घरामध्ये लपण्यास जागा देत होते. त्यांच्या आदेशावरून कधी स्वेच्छेने तर कधी बळजबरीने सुसाईड बॉम्बर बनत होते. यासारख्या धोक्यांना उत्तर देताना अमेरिकन सैन्याकडून दशतवाद्यांसोबतच सामान्य अफगाणी जनतेला लष्करी कारवाईला सामोरे जावं लागत होते. अश्या वॉर क्राईमसाठी अमेरिकेवर  गेल्या वीस वर्षात अनेकवेळा टीका झाली होती. 

अमेरिका – अफगाणिस्तान युद्धामध्ये झालेली वित्तहानी आणि जीवितहानी

अमेरिकन सैन्य माघारी बोलवण्याची घोषणा करताना एक पत्रकाराला उत्तर देताना अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन म्हणले होते कि, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारले आणि अल – कायदाच्या दहशतवादी कॅंप्सना उध्वस्त करून आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं. त्याचबरोबर आम्ही आधुनिक शस्त्र सामुग्रीने सज्ज असे ३ लाख अफगाणी लोकांचे सैन्य उभारले असून कोणत्याही कट्टरवादी दहशहतवादी गटांना या सैन्याला हरवणं शक्य होणार नाही.

पण घडलं काय. अवघ्या दहा दिवसात तालिबान्यांनी अफगाणी सैन्याचा पराभव करून संपूर्ण अफगाणिस्तनवार आपली सत्ता प्रस्थापित केली. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी अक्षरश पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन देशातून बाहेर पळून गेले. 

अफगाणिस्तानवर तालिबान्यांचे पुन्हा एकदा राज्य. पुढे काय?
अफगाणिस्तान एक इस्लामिक राष्ट्र असून इथल्या नागरिकांना, विदेशी संस्थाना आम्ही संरक्षण देवू. अफगाणी नागरिकांना स्वतच्या प्रगतीची पुरेपूर संधी दिली जाईल, पण सर्वांना इस्लामिक शरिया कायद्याचं काटेकोर पालन करणं अनिर्वाय असेल. आमच्या विरोधात लढलेल्या अफगाणी नागरिकांना आम्ही माफ केलं असून त्यांची इच्छा असल्यास ते आम्हाला येऊन मिळू शकतात. काबूलमधुन पत्रकार परिषद घेत तालिबान प्रवक्त्याने हे जाहीर केले होते. परंतु पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरची परीस्थिती वेगळी आहे. 

गेल्या वर्षभरापासून अफगाणिस्तानमधील सुधारणावादी जनता, पत्रकार, राजकारणी, मानवी हक्क कार्यकर्ते, महिला राजकारणी, शिक्षक, महिला पत्रकार एकूणच आपल्या विरोधात काम करणाऱ्या लोकांच्या हत्या करण्यास तालिबानने सुरुवात केली होती. आता तर गल्ली – मोहल्यामध्ये घुसून अमेरिकन सैनिकांना मदत करणाऱ्या अफगाणी सैनिकांना, महिलांना शोधून ठार मारत असल्याच्या असंख्य बातम्या पुढे येत आहेत. तालिबान्यांच्या भीतीने हजारो लोक मिळेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडून जात आहेत.

भारतीयांना क्रिकेटची भाषा लवकर कळते. काही वर्षांपूर्वी अफगाणी क्रिकेटपटू रशीद खानने  जेव्हा आपल्या अफगाणिस्तानातील एका क्रिकेट अकॅडमीला भेट दिली, तेंव्हा तिथे त्याला त्याच्याच सारखी गोलदांजी करणारे शेकडो मुलं भेटली. त्याच्याच सारखी जगभरात क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असणारी. आज ती मुलं काय करत असतील?

कॅप्टन टरलॅन एव्हीयझॉव्ह नावाचा रशियन सैनिक अफगाणिस्तानमधून भर पडताना म्हणलं होता, अफगाणिस्तानातील कित्येक पिढ्या युद्धात जन्मल्या आहेत. युद्धच त्यांचे जीवन आहे. युद्धच त्यांच्या नशिबी असणार आहे. अफगाणिस्तानमधील सुधारणावादी जनता पुन्हा एकदा तालिबानी दहशतवाद्यांशी लढायला तयार होत आहे. शिक्षण, व्यवसाय, पत्रकारिता, विज्ञान क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवण्याची स्वप्न पाहणारे असंख्य अफगाणी युवक-युवतीनी  पुन्हा एकदा आता हातामध्ये शस्त्र घेतली आहेत.

तालिबान्यांच्या विरोधात लढण्यास शस्त्र हातात घेतलेली सुधारणावादी अफगाणी जनता.

अफगािस्तानमधील कित्येक दशकांच्या ह्या रक्तरंजित गोंधळाला कारणीभूत कोण आहे?

आपल्या स्वार्थापोटी अफगाणी लोकांना धर्मांध बनविणारे इस्लामिक कट्टरवादी नेते? की त्यांच्या अतिरेकी आवाहनाना बळी पडणारी धार्मिक अफगाणी जनता? आपली युद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानचा युद्धभूमिसारखा वापर करणारी अमेरिका, रशिया सारखी प्रगत राष्ट्र? की वरवर सुधारणावादी अफगाणी लोकांचं नेतृत्व करणारे परंतू आतून भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय व्यवस्था तयार करणारे अफगाणी नेते? याबाबत बारकाईने विचार करून जगभरातल्या लोकांना लवकर सावध होण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here