राजगडमध्ये डोंगरावर आढळल्या वाघाच्या पाऊलखुणा, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
मूल, 21 ऑगस्ट: तालुक्यातील राजगड परिसरात स्थानिक नागरिकांना वारंवार वाघाचे दर्शन होत असल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. गावाजवळील डोंगरावर काही गावकर्यांना सोमवार, 21 ऑगस्टला वाघ आढळून आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वाघाला ट्रॅप करण्यासाठी डोंगरावर कॅमेरे लावण्यात आले आहे. दरम्यान, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी येथील उपसरपंच चंदू मारकवार यांनी केली आहे.
राजगड येथील सुनील गेडाम हा युवक पायथ्याशी असलेल्या डोंगरावर काटवल ही रानभाजी तोडण्यासाठी चढला होता. यावेळी त्याच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला. मात्र त्याच्या हातात काठी असल्याने त्याने वाघाचा हल्ला परतवून लावला. ही माहिती चंदू पाटील मारकवार यांना माहित होताच त्यांनी वनविभागाला कळविले. सावली वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली.त्यां ना वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यांनी वाघाला शोधण्यासाठी मोहीम राबविली. तसेच डोंगरावर कॅमेरे लावले. बोरचांदली ते चांदापूर रस्ता ओंलाडून वाघ राजगडच्या शेतशिवारातून डोंगरावर चढला असावा असा अंदाज बाधण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने राजगड आणि आजूबाजूच्या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात खरीप शेतीचा हंगाम सुरू आहे. सर्वत्र धान पिकाची रोवणी सुरू आहे. यासाठी शेतकर्यांना आणि शेतमजूरांना शेतात जावे लागते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे खरीप हंगाम धोक्यात येवू शकतो. त्यामुळे वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तात्काळ पावले उचलावी, अशी मागणी मारकवार यांनी केली आहे.