सूत्रकार लाखनपाडा खदानीमुळे ग्रामस्थ त्रस्त; बंदची जोरदार मागणी
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
तलासरी :- तलासरी तालुक्यातील सूत्रकार लाखनपाडा परिसरात सुरू असलेल्या खदानीमुळे स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. खदानीतील सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून, भिंतींना गंभीर भेगा पडल्या आहेत. दगड थेट घरांवर व शेतांमध्ये पडत असल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, नुकत्याच घडलेल्या घटनेत कोणतीही पूर्वसूचना न देता दुपारी दोन वाजता जोरदार स्फोट करण्यात आला. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली. शेतातील पिके जळून गेली असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून, खदानी तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, निवेदन देऊनही ग्रामपंचायत व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
शिवसेना डहाणू विधानसभा प्रमुख सुनील इभाड यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “याकडे दुर्लक्ष झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.”
दरम्यान, तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले की, “दोन्ही पक्षांना सूचना दिल्या असून, कागदपत्रांच्या आधारे पुढील चौकशी केली जाईल.”
या प्रकरणात ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.