“धुंदलवाडी ते उधवा रस्ता – खड्डेमय अवस्थेत, नागरिकांचा जीव धोक्यात!”
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
धुंदलवादी :- पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात धुंदलवाडी ते उधवा जाणारा मुख्य रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरचे डांबर पूर्णपणे निघून गेले असून पावसाळ्यात मोठमोठे तलावासारखे खड्डे तयार झाले आहेत. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
रोज शेकडो नागरिक नोकरी, धंदा, शाळा, बाजारहाट यासाठी या रस्त्याचा वापर करतात. परंतु खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज लागत नसल्याने दररोज अपघात घडत आहेत. आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “गेली कित्येक वर्षे हा रस्ता अशाच अवस्थेत आहे. अनेकदा प्रशासनाला तक्रारी करूनही दुरुस्ती होत नाही. अपघात घडले तरी संबंधित अधिकारी डोळेझाक करत आहेत.”
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे धुंदलवाडी ते उधवा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.