पत्नी ने मुलाला जेवण नाही दिला म्हणून पती ने केली पत्नी ची हत्या
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नागपूर :क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरला. त्यानंतर पोटावरही सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. काही वेळाने राग शांत होताच त्याला आपली चूक कळली. तो पत्नीला घेऊन रुग्णालयात पोहोचला. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी मानकापूर ठाण्यांतर्गत घडली.
बिस्ताबाई चंद्रदयाल मसकुले (वय 25, रा. स्नेह कॉलनी, प्रकाशनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी बिस्ताचा पती चंद्रदयाल समलू मसकुले (वय 26) याला अटक केली. मसकुले दाम्पत्याला एक 3 वर्षांचा मुलगा ही मध्यप्रदेशच्या शिवनी येथील रहिवासी आहेत. मजुरीसाठी नागपुरात आले होते. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास मुलाला भूक लागल्यामुळे तो वारंवार आईला जेवण मागत होता. बिस्ताबाई त्याच्या जेवणाची तयारी करत होती. मुलाच्या रडण्याला वैतागून चंद्रदयालचा पारा चढला. त्याने पत्नीला शिविगाळ करून वाद घातला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊ लागले.
चंद्रदयालने रागात येऊन स्वयंपाकखोलीत ठेवलेला चाकू आणला आणि बिस्ताबाईच्या गळ्यावर वार केला. रक्ताची धार लागली. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने बिस्ताबाईच्या पोटावर सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. काही वेळाने चंद्रदयालचा राग शांत झाला. आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आरडा-ओरड करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले.
बिस्ताबाईला ऑटोमध्ये टाकून मानकापूरच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, डॉक्टरांनी तपासताच बिस्ताबाईला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरच्या ठाणेदार शुभांगी वानखेडे घटनास्थळावर पोहोचल्या. झोन 2 चे डीसीपी राहुल मदने यांनीही घटनास्थळाचा आढावा घेतला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून चंद्रदयाल याला अटक केली.