पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या पतीस दहा वर्षांचा कारावास
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 21 सप्टेंबर
पत्नीला हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणार्या आरोपी पतीस चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रवींद्र मुरलीधर पारधी (42, रा. मालडोंगरी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. हा निकाल 20 सप्टेंबर रोजी देण्यात आला.
मालडोंगरी येथील रवींद्र पारधी याचे लग्न 2008 मध्ये झाले. लग्नानंतर तो पत्नीशी काही दिवस चांगला राहिला. त्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडल्याने तो पत्नीकडे पैशाची सतत मागणी करीत होता. पैसे न दिल्यास भांडण करून चारित्र्यावर संशय घेत होता. या त्रासाला कंटाळून पत्नी शेता जातो असे सांगून घरून निघून गेली व मालडोंगरी शिवारातील विहिरीत दोन्ही मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी रवींद्र पारधी याच्या विरोधात कलम 498 (अ), 306 भादंवी अन्वये गुन्ह्या दाखल केला. या प्रकरणात चंद्रपूर न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश- 2 भालचंद्र यांनी साक्षीदार तपासून व योग्य पुराव्याच्या आधारे रवींद्र पारधी यास कलम 498 (अ ) भादंवीमध्ये 3 वर्ष शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा, कलम 306 भादंवीमध्ये 10 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा कलम 235 (2) सीआरपीसी नुसार शिक्षा ठोठावली.
या गुन्हाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी केला. सरकारतर्फे अॅड. संदीप नागपुरे यांनी काम पाहिले.