Home latest News पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीने...
पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीने पोलादपूर दणाणले
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर – पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, पोलादपूर यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
ही मिरवणूक भैरवनाथ नगर येथून सुरू होऊन मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळून पुढे विद्यामंदिर पोलादपूर शाळेत समाप्त झाली. मिरवणुकीत शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठी पोशाख परिधान केला होता, तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी नेसून ढोल-ताशाच्या गजरात लेझीम आणि मर्दानी खेळ सादर केले. शहरातील प्रमुख ठिकाणी झालेल्या या सादरीकरणाने नागरिकांमध्येही उत्साह संचारला. मिरवणुकीच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानवंदना देण्यात आली.
या मिरवणुकीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद तसेच स्कूल कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मिरवणूक शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडली.