Home latest News स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात महिला आरोग्य शिबिर...
“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात महिला आरोग्य शिबिर व दिव्यांग तपासणी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न
सिध्देश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी –
8482851532
पोलादपूर. ग्रामीण आरोग्याच्या सशक्तीकरणासाठी आणि महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेसाठी “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानांतर्गत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात महिला आरोग्य शिबिर तसेच दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विविध आजारांची तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि दिव्यांग नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणीनंतर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे होते. प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा सौ. शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, आमदार प्रतिनिधी सुनील मोरे, तसेच डॉ. गिरी, डॉ. सलागरे, डॉ. शिंदे, तहसीलदार श्री कपिल घोरपडे नायक तहसीलदार श्री सानप, पोलीस प्रशासनातर्फे पो.कॉ. ऋतुजा पवार, आणि श्री मोहम्मद मुजावर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मोठ्या संख्येने महिलावर्ग आणि दिव्यांग नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
कार्यक्रमाला संबोधित करताना श्री चंद्रकांत कळंबे म्हणाले, “पोलादपूर तालुका हा दोन घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथील नागरिकांना तातडीच्या आरोग्यसेवेची आवश्यकता आहे. त्यामुळे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले, “जर महिला आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल, तर संपूर्ण कुटुंब सशक्त राहते. घरातील महिलाच प्रत्येक संकटाला समर्थपणे सामोरी जाते व संपूर्ण घराला आधार देते. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे आपल्या समाजाच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ग्रामीण रुग्णालय पोलादपूर व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आले.