चेन स्नॅचिंग करणारा आरोपी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात – इतर गुन्ह्यांचीही कबुली

30

चेन स्नॅचिंग करणारा आरोपी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात – इतर गुन्ह्यांचीही कबुली

प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर नाशिक जिल्हा
मो. 8668413946

नाशिक │ शहरात अलीकडे चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार संशयितांवर ‘स्टॉप अँड सर्च’ कारवाई आणि सतर्क गस्त सुरू करण्यात आली आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व सहा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने 20 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान सापळा रचून सलमान छंगा खान (वय 30, रा. अख्तर केटरर्स, विनयनगर, नाशिक) या संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांनी ही कारवाई केली.

सदर आरोपीकडे चौकशीदरम्यान गुन्हा रजिस्टर क्र. 285/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) प्रमाणे दाखल सोनचोरीचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून आरोपीला तपासी अंमलदार एस.पी. गारले यांच्या ताब्यात दिले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

यानंतर पुढील चौकशीत आरोपी सलमान खानने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिली. हे गुन्हे गुन्हा रजिस्टर क्र. 32/2025 आणि गुन्हा रजिस्टर क्र. 60/2025, दोन्ही भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) अंतर्गत दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आरोपीकडून एकूण 3 लाख 13 हजार 950 रुपये किमतीचे 30 ग्रॅम 40 मिली सोने हस्तगत केले आहे.

इंदिरानगर पोलिसांनी संशयित चेन स्नॅचिंग प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी गस्त आणि स्टॉप अँड सर्च मोहिम अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.