घरी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला अपघातात पती ठार, पत्नी जखमी.
प्रतिनिधी
नागपुर:- दिवसभर कंपनीत काम करून सायंकाळी दुचाकीने डबलसीट घराच्या दिशेने निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला़ गावाजवळ पोहचण्याआधीच विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव मालवाहूने जबर धडक दिल्याने पती घटनास्थळीच मृत्यूमुखी पडला तर पत्नी गंभीर जखमी झाली़ ही घटना सुसुंद्री शिवारात घडली़
मदन तेजराम पांडे 40 असे मृतक पतीचे तर त्रिवेणी मदन पांडे 35 दोघेही रा़ मोहपा असे जखमी पत्नीचे नाव आहे़ घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी दोघेही पती-पत्नी नागपूर-काटोल मार्गावरील उबगी येथील कंपनीमध्ये कामावर गेले होते़ सायंकाळी घराच्या दिशेने आपल्या एमएच 31 एडब्लु 1421 क्रमांकाच्या बजाज कासासाकी या दुचाकीने मोहपा येथील घरी निघाले़ सुसुंद्री गाव पार केल्यानंतर सुरेश नागपूरे यांच्याशेताजवळ पोहचले असता विरूध्द बाजुने मोहपा येथून सुसुंद्रीकडे भरधाव येत असलेल्या एमएच 40 एके 4276 क्रमांकाच्या बोलेरो पीकअप मालवाहूने समोरून जबर धडक दिली़ यात दुचाकी रस्त्याच्या बाजुला फेकली गेली़ या अपघात मदनचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मागे बसलेली त्रिवेणी गंभीर जखमी झाली़ अपघातानंतर आरोपी मालवाहू चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला़ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने जखमी महिलेला मोहपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले़ तर घटनास्थळाचा पंचनामा करून मदनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला़
पांडे दाम्पत्याकडे शेती किंवा इतर कुठलाही व्यवसाय नाही़ घरी मदनचे आई वडील 13 व 8 वर्षाच्या दोन मुली आहे़ त्रिवेनी व मदन दोघेही नागपूर- काटोल मार्गावरील एका कंपनीत कामावर होते़ त्याच्या भरोशावर त्यांच्या संसाराचा गाडा चालायचा़ कामावरून चिमुकल्यां मुलींच्या ओढीने घराच्या दिशेने निघालेल्या दाम्पत्यावर असा अचानक झालेल्या काळाच्या घाल्यामुळे मोहपा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे़