कोकणातील मतदारांची आपल्या गावी जाऊन मतदान करण्यासाठीची धडपड
सचिन पवार
कोकण ब्युरो चीफ: 8080092301
रायगड :-पनवेल बस आगारात प्रचंड गर्दी.मतदान कार्यात लाल परी च्या इलेक्शन ड्युटी मुळे प्रवासी वाऱ्यावरती.रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात पनवेल बस स्थानकात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली असून मतदान करण्यासाठी कोकणवासीय अलिबाग, मुरूड, महाड, पोलादपूर, माणगाव, खेड, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी आपल्या गावी जात आहेत.विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यासाठी बहुतांशी एसटी बसेस वापरात आणल्या गेल्या आहेत. सुमारे ७० टक्के बसेस या कामात असल्याने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदारांना सकाळपासून एसटी चा फटका बसला आहे.मतदान प्रक्रियेसाठी लाल परी कार्यरत असल्यामुळे पनवेल बस आगारात बस संख्या कमी झाली आहे.
त्यात मुंबई ठाणे, बोरिवली या ठिकाणाहून पनवेल आगारात येणाऱ्या कोकणातील सर्व बसेस या प्रचंड भरून येत असल्यामुळे पनवेल येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांना बस मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील एसटी व्यवस्था जवळपास बंद आहे. तर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरी सुरू असल्या तरी त्याचेही प्रमाण अत्यल्प आहे.यामुळे नियमित एसटी प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे.तर, इलेक्शन ड्युटी अत्यावश्यक असल्याने प्रवाशांना काही काळ संयम राखावा लागेल, असे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.