पालकांना लूटणा-या नागपुरातील 15 शाळांकडून वसूल करणार 100 कोटी 

पालकांकडून अतिरिक्त शिक्षण शुल्कापोटी घेतलेल्या 100 कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूर :- नारायणा विद्यालयाने पालकांकडून घेतलेल्या अतिरिक्त शिक्षण शुल्कापोटी गेल्या दोन वर्षातील 7.59 कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे. नागपुरातील याच प्रकारच्या पालकांना लुटणार्‍या 15 शाळांवर महिनाभरात कारवाई केली जाणार असून किमान 100 कोटी रुपये वसूल केले जातील अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिली. 2014 च्या शिक्षण शुल्क अधिनियम कायद्यातंर्गत ही राज्यातील पहिलीच धडक कारवाई असणार आहे हे विशेष.

नारायणा शाळांकडून होणार्‍या अतिरिक्त शुल्क वसुली संदर्भात गेले अनेक दिवस पालकांचा संघर्ष सुरु होता अखेर या लढ्याला यश आले आहे. न्यायालयीन लढाईत टिकण्यासाठी पालकांच्या तक्रारी व सबळ पुरावे महत्त्वाचे असल्यावर भर देतानाच ना.बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की या शाळांवर कारवाई करताना कुठलाही भेदभाव किंवा कुणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड भक्कमपणे या बाबतीत पाठिशी आहेत. मध्यंतरी राज्यातील काही शाळांबाबतच्या तक्रारीसंदर्भात आपल्याला मंत्री व विरोधकांचे फोन आल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात कबूल केले. शिक्षण विभागातील अधिकारी देखील गेले अनेक दिवस कारवाईसाठी कचरत होते असेही त्यांनी मान्य केले. नारायणाच्या व्यवस्थापनाने 2017-2018 व 218-2019 चीच माहिती दिली. उर्वरित तीन वर्षांची माहिती मिळालेली नाही यानंतरच्या काळात ही रक्कम वाढू शकते. अनुदान रोखणे, मालमत्ता जप्ती व इतरही सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांच्या भवितव्याचा विचार करता अनेक पालक तक्रारीसाठी पुढे येत नसताना हा संघर्ष कौतुकास्पद असल्याची प्रशंसा त्यांनी केली. शिक्षण शुल्क अधिनियमात दोन वर्षात एकदा व 15 टक्केपेक्षा कमी शिक्षण शुल्क वाढीस मान्यता असताना या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत. मात्र, सबळ पुराव्यांशिवाय उपलब्ध मनुष्यबळात चौकशी होऊ शकत नाही असेही ते म्हणाले. दोन-तीनशे शाळांच्या तक्रारी असल्या तरी  लवकरच नागपुरातील 15, पुण्यातील 3 तर मुंबईतील 3 शाळा व्यवस्थापनाविरोधात चौकशी पूर्ण झाली असल्याने नारायणा विद्यालयाच्या धर्तीवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती ना. बच्चू कडू यांनी दिली.  यावेळी पालक संघर्ष समितीचे सर्वश्री अभिषेक जैन, सोनाली भंडारकर, अजय चालखुरे, संजय शर्मा, गुरुजित रांडेलिया आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here