राज्यातील महिलांना बंदूक परवाने द्या, वंचित बहुजन आघाडीची मागणी

कोल्हापूर :- वंचित बहुजन आघाडीनं कोल्हापुरात भव्य मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. महिला अत्याचारात वाढ होत असल्याचं सांगत त्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केलीय.

राज्यातील महिलांना बंदूक परवाने द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं कोल्हापुरातील जिल्हा प्रशासनाकडे केलीय. या मागणीचं निवेधन वंचित बहुजन आघाडीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. राज्यातील महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. काही ठिकाणी महिलांना तक्रार नोंदविल्यानंतरही न्याय मिळेपर्यंत संघर्ष करावा लागतोय. महाराष्ट्र शासनानं महिलांना सक्षम करण्याची गरज असल्याचंही मतही व्यक्त केलंय.

महिला अत्याचारांच्या घटनांवर कठोरपणे कारवाई करण्याची गरज आहे. महिलांना बळकटी देण्यासाठी दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात शक्ती कायदा लागू केल्याचं निदर्शनास येत आहे. पण या कायद्यांन्वये राज्यात किती महिलांना न्याय मिळाला. तसेच महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी कोणती कठोर पावलं उचलली, याची चिंताही सतावत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय.

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतकरी देशोधडीला : प्रकाश आंबेडकर

“राजधानी दिल्लीत देशातभरातून आलेला शेतकरी गेले 20 दिवस थंडीत कुडकुडत आपल्या न्याय-मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेतीसंबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले. या नवीन कायद्यामुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागणार आहे”, असं मत व्यक्त करत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा असल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं.

“महाराष्ट्र सरकारचे धोरण शेतमाल नियमनमुक्तीचे आणि बाजार समित्यांच्या बाहेर खुल्या बाजारात विक्रीला पाठिंबा देण्याचे आहे. असे असूनही दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या पक्षांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारने किमान हमी भावाची निःसंदिग्ध ग्वाही दिली पाहिजे”, असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here