गॅलरीतून खाली पाहताना तोल गेला, तिसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

61

गॅलरीतून खाली पाहताना तोल गेला, तिसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

कोथरूड:- गॅलरीतून आईला खाली वाकून पाहत असताना तोल जाऊन पडल्यामुळे तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीत घडली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अविष्का विशाळ कोळपकर वय 3 वर्षे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील वृंदावन पार्कमधील महात्मा सोयायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर कोळपकर कुटुंबीय राहतात. अविष्का ही त्यांची तीन वर्षांची मुलगी होती.

अविष्का हिचे वडील विशाल हे खासगी कंपनीत नोकरी करतात. रविवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास अविष्काच्या आईला भाजी आणण्यासाठी खाली जायचे होते. त्यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे त्यांनी तिला घरातच थांबण्यास सांगत खाली जाऊन येत असल्याचे सांगितले. त्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करून खाली गेल्या.

थोड्या वेळानंतर अविष्का ही आई आली का? हे पाहण्यासाठी गॅलरीत गेली. ती गॅलरीतून खाली वाकून पाहत होती. खाली पाहत असताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली आणि ती गंभीर जखमी झाली.

तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अविष्का ही आई-वडिलांना एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.