डिग्रस येथे प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
अहमदनगर — राहुरी :- प्रेम संबंधातून राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील संजय गावडे या 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. संजय याने प्रेम प्रकरणातूनच आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
संजय रभाजी गावडे वय 26, रा. डिग्रस, ता. राहुरी हा तरुण राहुरी येथील महावितरणमध्ये वायरमन म्हणून नोकरी करत होता. त्याचे एका मुलीबरोबर अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. चार ते पाच दिवसांपूर्वी संजय गावडे हा तरुण घरातून बेपत्ता झाला होता. दोन ते तीन दिवसांनंतर तो परत आला होता. राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात रमण काॅम्प्लेक्स येथे महावितरणचे काही कर्मचारी फ्लॅट भाडोत्री घेऊन राहत होते. दोन दिवसांपासून संजय हा त्यांच्या सोबत राहत होता. 20 डिसेंबर रोजी सकाळी सर्व जण कामावर गेले. संजय हादेखील त्यांच्या बरोबर कामावर गेला. मात्र, काही वेळाने तो परत आला.
रूमला आतून कडी लावली आणि दुपारी दीड वाजेच्या सुमारास विद्युत केबलच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याचे मित्र दुपारी जेवण करण्यासाठी फ्लॅटमध्ये गेले असता रूमला आतून कडी लावलेली होती. मित्रांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, हवालदार शिवाजी खरात, सोमनाथ जायभाय, प्रवीण खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजयला मयत घोषित केले. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके करीत आहेत.