स्पॉटलाईट: जागतिक खेळांमध्ये भारत मागे का?        

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो:९९२२५४६२९५

लियानेलं मेस्सीच्या अर्जेंटिनाने फ्रांसवर रोमहर्षक विजय मिळवत फुटबॉलचा विश्वचषक आपल्या नावे केला. कतारमध्ये पार पडलेली ही विश्वचषक स्पर्धा सर्वार्थाने यशस्वी ठरली. फुटबॉलच्या विश्वचषकात संपूर्ण जग महिनाभर न्हाऊन निघाले. जगभरातील ३४ देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. अर्थात हे सर्व संघ पात्रता फेरीत विजय मिळवून विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. विश्वचषक खेळणाऱ्या ३४ संघांची यादी पाहिली तर त्यात घाना, इक्वेडर, ट्युनिशिया, सेनेगल, उरुग्वे यासारखे देशांची नावे दिसतात. हे देश जगाच्या नकाशात शोधायला गेले तर लवकर सापडणारही नाही. अगदी टिंबा एव्हढ्या या देशांची लोकसंख्याही काही लाखांच्या घरात. बरे हे देश प्रगत म्हणावे तर तसेही नाहीत. अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मागास म्हणून गणना होणारे हे देश . तरीही फुटबॉलमध्ये कौशल्य दाखवून जागतिक पटलावर चमकणारे देश. याउलट आपला देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश. लोकसंख्येत जगात दुसरा क्रमांक. १४० कोटी लोकसंख्या असलेला खंडप्राय देश पण फुटबॉलमध्ये पहिल्या शंभरातही नाही. 

आशिया खंडातील चीन, जपान, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, इराण या देशाचे खेळाडू विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशासाठी घाम गाळतात. भारत मात्र यात कुठेही दिसत नाही ; याची खंत ना देशातील क्रीडा रसिकांना ना राज्यकर्त्यांना. देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष उलटली तरी आपण फुटबॉलमध्ये प्रगती का करू शकलो नाही याचा विचार करायला कोणाकडेच वेळ नाही. बरं ही गत फक्त फुटबॉलचीच आहे असेही नाही तर ऑलिम्पिकमध्येही आपली हीच गत आहे. ऑलिम्पिकमध्ये अन्य देश जिथे डझनावारी पदके मिळवतात तिथे आपल्या देशाला एका हाताच्या बोटावर मोजता येईल इतके पदके मिळतात आणि ते ही ठराविक खेळातच. फुटबॉल असो वा ऑलिम्पिक यासारख्या जागतिक खेळात आपला देश मागे का आहे ? याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. 

आपल्या पेक्षा अविकसित देश खेळात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत . त्या देशात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतात मग आपल्या देशात का होत नाही याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा. क्रीडा क्षेत्राबाबत आपले सध्याचे जे धोरण आहे ते याला कारणीभूत आहे का ? याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. देशातील खेळाडूंना सर्व सुविधा मिळतात का ? त्यांना खेळण्यासाठी पोषक वातावरण आहे का ? हे पाहण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे ते त्यात निश्चितपणे कमी पडत आहेत. आपल्या देशात क्रीडा क्षेत्रातही राजकारण शिरले आहे ते आधी बाजूला सारले पाहिजे. सरकारने क्रीडा क्षेत्र राजकारण मुक्त केले पाहिजे.  

२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे खेळाडू जास्तीतजास्त पदके मिळवतील आणि पुढील चार वर्षात भारतीय फुटबॉल संघ किमान पहिल्या शंभरात येईल याचे नियोजन आतापासूनच करायला हवे. पुढील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देतील आणि फुटबॉलमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करतील असे खेळाडू हेरून त्यांना आतापासूनच सर्व सुविधा पुरवून प्रशिक्षण द्यायला हवे. खेलो इंडिया सारख्या उपक्रमात केवळ वैयक्तिकच नव्हे तर सांघिक खेळांचाही समावेश करून त्या खेळातील खेळाडूंना विदेशातील तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण द्यायला हवे. त्यांना हवे त्या सर्व सोयी सुविधा पुरवायला हव्यात. सर्वात महत्वाचे म्हणजे देशात क्रीडा संस्कृती रुजवायला हवी. त्यासाठी शालेय स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.

 शाळा महाविद्यालयात क्रीडा हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. आजही खेळाच्या तासाला इंग्रजी आणि गणित विषय शिकवला जातो. शाळा महाविद्यालयात क्रीडा हा विषय केवळ केवळ नावापुरताच आहे. पालकही मुलांना खेळापेक्षा अभ्यासाकडे जास्त लक्ष देण्यास सांगतात. खेळाला आपल्याकडे कायम दुय्यम नजरेने पाहिले जाते. ऑलिम्पिक आणि जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करायचे असेल तर खेळाबाबतची आपली मानसिकता बदलायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here