अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तीवर फेकला जळता टायर कानात अडकलं, भाजल्याने निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू.

निलगिरी जिल्ह्यातील मसिनागुडी भागात असलेल्या एका रिसॉर्टच्या परिसरात हा हत्ती फिरत असताना त्याच्यावर हे कापड फेकण्यात आलं होतं. जळतं कापड या हत्तीच्या कानावर पडलं होतं. कापड काढता येत नसल्याने हत्तीला काहीच सुचेनासं झालं होतं. कापड जळून खाक होईपर्यंत हत्तीचा कान भाजला होता. काही दिवसांपूर्वी सिंगारा वनक्षेत्र परिसरात स्थानिकांना हा हत्ती वेदनेने विव्हळताना दिसला होता. बोक्कापुरम भागातील नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या जखमी हत्तीबाबत कळवलं होतं. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर हत्तीला गुंगीचं औषध दिलं होतं. ज्यानंतर त्यांनी हत्तीची बारकाईन पाहणी केली असता हत्तीच्या कान आणि पाठीच्या भागाजवळ त्यांना जखमा दिसून आल्या होत्या.
या हत्तीला रुग्णालयात दाखल करण्याचं अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. वासन, विजय, गिरी आणि कृष्णा नावाच्या हत्तींची मदत घेत या जखमी हत्तीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकमध्ये चढवत हत्तींसाठीच्या उपचार केंद्राकडे रवाना केलं होतं. मात्र थेप्पाकडूजवळ या हत्तीचा ट्रकमध्ये असतानाच मृत्यू झाला.
हत्तीवर जळतं कापड फेकल्यानंतर तो सैरावैरा धावत असतानाचा व्हिडीओ हा व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळेच हा प्रकार उघडकीस आला आहे . या व्हिडीओच्या आधारे प्रसात आणि रेमंड डीन नावाच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रिकी रायन नावाची व्यक्तीही या घटनेत सामील असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अजून अटक केलेली नाहीये. इतर दोन आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना 3 जानेवारीची असून मुडूमलाई वनक्षेत्राचे संचालक एलसीएस श्रीकांत यांनी सांगितलं की अटक केलेल्या आरोपींमध्ये रिसॉर्टच्या मालकाचाही समावेश आहे. हत्ती रिसॉर्ट परिसरात फिरत असताना मध्यरात्री त्याच्यावर हे कापड फेकण्यात आलं होतं. यावेळी आरोपींपेकी एकजण हा दारूच्या नशेत होता असंही श्रीकांत यांनी सांगितलं आहे. ज्या रिसॉर्टबाहेर हा प्रकार घडला ते रिसॉर्ट सील करण्याचे आदेश निलगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.