मुंबई : मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी ३ महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्या धर्तीवर रेल्वेने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी अरबी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची विश्वसनीय माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संबंध महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल रेल्वेमध्ये दररोज लाखो चाकरमाने प्रवास करतात. दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संघचनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत.सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना बुधवारी दिल्या. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ला, आपटा येथे बसमध्ये सापडलेला बॉम्ब आणि कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार, येत्या ३ महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे ३ महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here